धुवाधार पावसाने सांगलीसह जिल्ह्याला झोडपले; रस्त्यावर पाणीच पाणी; खरीप पिकांचे मोठे नुकसान
By अशोक डोंबाळे | Published: October 22, 2022 04:39 PM2022-10-22T16:39:58+5:302022-10-22T16:40:26+5:30
वाळवा तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस
सांगली : शनिवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस झाल्यामुळे सांगली शहरासह जिल्ह्यातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वाळवा तालुक्यात तर सर्वाधिक २४ तासात ५६.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला आणि द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांचे गळीत हंगामही ठप्प झाले आहेत.
शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात धुवाधार पावसाने केलेली सुरुवात जवळपास साडेपाच वाजेपर्यंत चालू होती. ढगफुटी व्हावी, त्याप्रमाणात सांगली शहरात धुवाधार पाऊस झाला. शहरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. अनेक ठिकाणी पाणी रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते.
वाळवा तालुक्यात तर सर्वाधिक ५६.४ मिलीमीटर पाऊस झाला असून अनेक ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, शिराळा, मिरज, पलूस, कडेगाव, आटपाडी तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. शेतामध्ये सर्वत्र पाणी साचून राहिल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रब्बी पेरण्या पूर्णत: ठप्प झाल्या आहेत.
साखर कारखान्यांचे गळीत हंगाम ठप्प
जिल्ह्यातील दत्त इंडिया, राजारामबापूसह अन्य कारखान्यांनी गळीत हंगाम चालू केले आहेत. या कारखान्याच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत; पण शनिवारी पहाटे झालेल्या धुवाधार पावसामुळे ऊस तोडी थांबल्या आहेत. परिणाम कारखान्यांचे गळीत हंगामही बंद राहिले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस
तालुका आज पाऊस एकूण पाऊस
मिरज २८.४ ६८४.७
जत ४.१ ६६५
खानापूर ३.४ ७९०.९
वाळवा ५६.४ ९७२.४
तासगाव २१.५ ७४८.६
शिराळा १८.३ १४९८.९
आटपाडी ९.३ ४८०.६
कवठेमहांकाळ १७.३ ८००
पलूस २४.९ ६६२.६
कडेगाव १४.३ ७९४.६
द्राक्षबागांमध्ये फुटभर पाणी
तासगाव, पलूस, मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये फुटभर पाणी साचून राहिले आहे. सध्या आगाप फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांची पोंगा, विरळणी, फुलोरा तर काही ठिकाणी डिपिंगची अवस्था आहे. या दरम्यान डाऊणीचा फैलाव होण्याची दाट शक्यता असते. त्यातच खराब हवामान व दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाने झोडपल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे.