चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 12:10 PM2021-07-22T12:10:12+5:302021-07-22T12:10:38+5:30
आज दि.२२ रोजी दुपारी ३ वाजता अंदाजे २ हजार ते ४ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग धरणातून नदी पाणी पात्रात सोडण्यात येणार आहे.
- विकास शहा
शिराळा : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होऊन गेल्या २४ तासात १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी मुळे चांदोली धरण पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे आज दि.२२ रोजी दुपारी ३ वाजता अंदाजे २ हजार ते ४ हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग धरणातून नदी पाणी पात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.
चांदोली धरण परिसरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मंगळवारी ६८ मिलिमीटर तर बुधवारी २४ तासात १८५ मिलीमीटर पावसाची नोंद होऊन अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरण ८१.७२ टक्के भरले असून धरणात २८.१२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातून धरणात २४ हजार ४४१ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.
धरणाची पाणी पातळी ६२०.२५ मीटर झाली आहे. तर आज अखेर एक हजार १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. संततधार पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे धरणाच्या पाण्याने सांडवा पातळी गाठली आहे. त्यामुळे आज गुरुवार (दि.२२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धरणाचे दरवाजे उघडून अंदाजे दोन ते चार हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.पावसाचा अंदाज घेऊन धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा विसर्ग कमी-अधिक प्रमाणात केला जाईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहावे असा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.