जिल्ह्यात सर्वत्र धुवाँधार पाऊस, इस्लामपूर, सांगलीत अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 02:20 PM2021-06-17T14:20:50+5:302021-06-17T14:22:59+5:30
Rain Sangli : सांगली जिल्ह्यात बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत सर्वत्र धूवाँधार पाऊस झाला. चोवीस तासातील आकडेवारीनुसार इस्लामपूर आणि सांगली परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेकठिकाणच्या नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी वाढली असून काहीठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत.
सांगली : जिल्ह्यात बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत सर्वत्र धूवाँधार पाऊस झाला. चोवीस तासातील आकडेवारीनुसार इस्लामपूर आणि सांगली परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेकठिकाणच्या नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी वाढली असून काहीठिकाणचे पूल पाण्याखाली गेले आहेत.
बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली. इस्लामपूरमध्ये चोवीस तासात ११० मिलिमीटर तर सांगलीत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन्हीठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
शिराळा, पलूस, कडेगाव व मिरज तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेकठिकाणी नद्या, नाल्यांवरील रस्ते पाण्याखाली गेले. नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी रातोरात मोठ्या प्रमाणात वाढली. सांगली, मिरज शहरे जलमय झाली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात मोठी घट झाली आहे. गुरुवारी कमाल तापमान २८ तर किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदले गेले. नदीपातळीतही वाढ होत असून सांगलीतील पाणीपातळी सध्या ७ फुटांवर गेली आहे.
धरणांमधील साठ्यात मोठी वाढ
चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्यामुळे एकूण पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. कोयना धरणात चोवीस तासात २.९६ टी.एम.सी.ने तर वारणा धरणात १.५१ टी.एम.सी. पाणीसाठा वाढला. कोयना धरण क्षेत्रात १९२ मिलिमीटर तर वारणा धरण क्षेत्रात ९७ मिलिमीटर पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे.
पावसाचे जिल्ह्यातील चित्र
- सांगली, मिरज शहरे जलमय झाली
- शिराळा तालुक्यात येळापूर ते समतानगर मार्गावरील पूल बुधवारी रात्रीपासून पाण्याखाली गेला
- कडेगाव तालुक्यात चिंचणी तलावात पाणी वाढल्याने येथील एक आपत्कालिन दरवाजा उघडण्यात आला.
- वाळवा तालुक्यात वाटेगाव येथील भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ
- वाळवा तालुक्यातील तिळगंगा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.
- आटपाडी व जत तालुक्यात पावसाचा जोर कमी आहे.
जिल्ह्यातील पाऊस मि.मी.(चोवीस तासातील नोंद)
- सांगली ८१.८
- मिरज ५१.५
- तासगाव ४४
- कवठेमहांकाळ १५.८
- शिराळा ६४.५
- कडेगाव ५९.८
- पलूस ५३.५
- विटा २६.५
- आटपाडी ७.८
- जत ३.२