चांदोलीत अतिवृष्टी, नदीकाठची पिके पुन्हा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:24 AM2021-08-01T04:24:44+5:302021-08-01T04:24:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वारणावती : चांदोली धरण परिसरात शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर पाऊस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : चांदोली धरण परिसरात शुक्रवारी रात्री आठ ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ७० मिलिमीटर पाऊस झाला. मात्र, दिवसभरात केवळ दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून १४,३७९ क्युसेकने वारणा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे पूरस्थिती जैसे थे आहे. वारणा नदीवरील चार पूल अद्यापही पाण्याखालीच आहेत.
चांदोली धरण परिसरात रात्रभर अतिवृष्टीचा पाऊस तर दिवसा रिपरिप सुरू असून, धरणातून १४ हजार ३७९ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. नदीकाठावरील पिके पुन्हा पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पंचनामे करण्यात अडचणी येत आहेत. पूर ओसरल्यावर पुन्हा पंचनामे होणार आहेत.
चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, शनिवारी सकाळी सांडव्यातून १३ हजार ५७० क्युसेक तर धरणाच्या वीजगृहातून ८०९ क्युसेक असा एकूण १४ हजार ३७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीत होत असल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे आरळा-शित्तूर, चरण-सोंडोली, कोकरूड-रेठरे, बिळाशी-भेडसगाव हे चार पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शिराळा व शाहूवाडी तालुक्यांमधील संपर्क तुटला आहे.
सध्या धरणात ३०.३७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ८८.२६ टक्के भरले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग सुरू ठेवला आहे. नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन धरण प्रशासनाने केले आहे.