धुमाळवाडी, जांभूळवाडी परिसरात वादळी पावसाचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:28 AM2021-04-28T04:28:05+5:302021-04-28T04:28:05+5:30
रेठरे धरण : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण, धुमाळवाडी, जांभूळवाडी परिसरात सोमवारी रात्री पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे माेठे नुकसान ...
रेठरे धरण : वाळवा तालुक्यातील रेठरे धरण, धुमाळवाडी, जांभूळवाडी परिसरात सोमवारी रात्री पाऊस व जोरदार वादळी वाऱ्यामुळे माेठे नुकसान झाले. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले तसेच जनावरांचे पत्र्याचे शेड सुमारे दोनशे फूट अंतरावर जाऊन पडले. जांभूळवाडीत घराची कौले व भिंतीच्या विटा पडून दोघेजण किरकोळ जखमी झाले. सर्व मिळून सुमारे १० लाखांवर नुकसान झाले आहे.
सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. धुमाळवाडी येथील महादेव नामदेव धुमाळ यांच्या घरावरील पत्रे लोखंडी अँगलसह शंभर ते दोनशे फुटापर्यंत जाऊन पडले. भिंतीवरील विटा ढासळल्या.
महादेव धुमाळ यांच्या घरावरील पत्र्यांचे छत तसेच घरातील टीव्ही, डिश, अंगणातील बोअरवेल व संसारोपयोगी साहित्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. तर प्रकाश बापू धुमाळ यांचे पत्र्याचे शेड उडून एक लाख रुपये, जांभूळवाडी येथील सर्जेराव रघुनाथ बांदल यांच्या घरावरील कौले व पत्र्याचे छत उडून एक लाख रुपयांचे, उमेश शिवलिंग जंगम व शंकर बापू बांदल यांचे पत्र्याचे शेड व घरावरील पत्र्याचे छत निघून सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शामराव आनंदा राजमाने यांच्या गगनगिरी महाराज मंदिरावरील पत्र्याचे छत व विटांची भिंत पडून ५० हजाराचे नुकसान झाले. महादेव शामराव धुमाळ, नंदकुमार धुमाळ, गणपती बापू कांबळे, अर्जुन चव्हाण, बबन यादव, संजय धुमाळ, रमेश चव्हाण, संदीप जाधव, आत्माराम धुमाळ, दीपक धुमाळ यांचेही पत्र्याचे शेड, छप्पर व गोबरगॅस पाईपचे नुकसान झाले आहे. याशिवाय प्रमोद दिगंबर पाटील, दिनकर जयसिंग पाटील, जयकर शिंगाडे यांचेही माेठे नुकसान झाले. विश्वास कापसे यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले. जांभूळवाडी येथील सर्जेराव बांदल व त्यांच्या पत्नी संगीता बांदल अंगावर काैले पडून किरकाेळ जखमी झाले.
धुमाळवाडी येथे विजेचा खांब पडून तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. रेठरे धरण ते जांभूळवाडी हद्दीत उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांच्या टॉवरवर वीज पडून दोष निर्माण झाला आहे. महावितरणचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कार्यरत होते.