मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी; डाळींच्या नुकसानीने सांगलीत चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 12:43 PM2022-07-28T12:43:37+5:302022-07-28T12:44:56+5:30
सांगली जिल्ह्यात मराठवाडा व विदर्भातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल येत असतो
अविनाश कोळी
सांगली : मराठवाडा व विदर्भात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाल्याने सांगलीच्या बाजारपेठेची चिंता वाढली आहे. या भागातून सांगलीत होणाऱ्या सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांच्या आवकवर व पर्यायाने दरावर आगामी काळात मोठा परिणाम होण्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सांगली जिल्ह्यात मराठवाडा व विदर्भातून मोठ्या प्रमाणावर शेतीमाल येत असतो. सांगलीच्या बाजारात उडीद व मूग डाळीचा ७० टक्के पुरवठा हा मराठवाड्यातील आहे. तसेच तूर डाळीचाही पुरवठा केला जातो. सांगलीच्या बाजारपेठेशी या दोन्ही विभागांचे नाते आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातील संकटाने सांगलीच्या बाजारावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे ८ लाख ५७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांचा समावेश आहे. पंचनाम्यानंतर याचे चित्र स्पष्ट होणार असले तरी सांगलीच्या बाजारात येणारा माल सुमारे ३० टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सध्या बाजारात तूर डाळीचा भाव १२ टक्क्यांनी वाढला असून, महागाईने कळस गाठला असताना त्यात आता या नुकसानीमुळे होणाऱ्या दरवाढीची भर पडणार आहे.
तूर डाळ दहा रुपयांनी महागली
सांगलीच्या बाजारात सात दिवसांतच तूर डाळीच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. साधी तूर डाळ ८५ रुपये किलोवरून आता ९५ रुपयांवर गेली आहे. प्रेसिडेंट तूर डाळ ९५ रुपयांवरून ११० रुपये झाली आहे. म्हणजेच १२ टक्के वाढ झाली आहे. मराठवाड्यातील नुकसानीमुळे येत्या काही महिन्यांत तूर डाळीचे दर वाढण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
मागील वर्षीही फटका
ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ मध्येही विदर्भ व मराठवाड्यात पावसाने पिकांची मोठी हानी झाली होती. त्यावेळीही डाळींसह हळदीच्या आवकवर व दरावर परिणाम झाला होता.
मराठवाड्यातील नुकसानीमुळे सांगलीच्या बाजारपेठेतील तूर डाळीची उपलब्धता पुढील काळात घटण्याची शक्यता आहे. त्याचा फटका येथील बाजाराला निश्चितपणे बसेल. या हानीमुळे दर कमी होण्याची शक्यता मावळली आहे. - एस. एम. गाला, व्यापारी, सांगली
सांगली जिल्ह्यात मराठवाड्यातून कडधान्यांची मोठी आवक होत असते. त्याठिकाणच्या पिकांच्या नुकसानीचा परिणाम आगामी काळात येथील बाजारातील आवकेवर व पर्यायाने दरावर होण्याची शक्यता आहे. - अण्णासाहेब चौधरी, माजी संचालक, मार्केट कमिटी, सांगली