सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, चांदोलीत अतिवृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:28 PM2023-07-20T16:28:41+5:302023-07-20T16:48:55+5:30

वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे

Heavy rains in Sangli district, Chandoli Dam is 50 percent full | सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, चांदोलीत अतिवृष्टी

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, चांदोलीत अतिवृष्टी

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून, बुधवारी चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. तेथे चोवीस तासात ६७ मिलिमीटर पाऊस झाला. यंदाची ही पहिलीच अतिवृष्टी आहे. वारणा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे कोकरुड बंधाऱ्यासह समतानगर पूल पाण्याखाली गेला आहे.

मान्सून पाऊस लांबल्यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच दोन दिवसांपासून संततधार पावसाने सुरुवात केली आहे. सर्वच तालुक्यांत बुधवारी दिवसभर संततधार सुरू होती. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. कोकरूड बंधाऱ्यासह समतानगर जवळील पूल पाण्याखाली गेला आहे. सततच्या पावसाने शेतीची कामे थांबली आहेत. चांदोली धरणात दिवसात १.१६ टीएमसीने पाणीसाठा वाढून १७.२५ टीएमसी झाला.

कोयनेत दिवसात सहा टीएमसीने वाढ

कोयना धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस कोसळत असून, धरणात दिवसभरात सहा टीएमसीने पाणीसाठा वाढून ३४.०४ टीएमसी झाला आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात दि. १ जूनपासून आतापर्यंतचा पाऊस मिलिमीटरमध्ये : मिरज १५.२ (८४), जत १४.२ (७०.६), खानापूर १०.४ (६१.०१), वाळवा ११.६ (८३.६), तासगाव १६ (९९.७), शिराळा ३६.३ (२४७.५), आटपाडी १०.२ (६४.५), कवठेमहांकाळ १७ (७१), पलूस ९.६ (६८.७), कडेगाव ५.७ (६८.५).

चांदोली धरण ५० टक्के भरले

चांदोली (ता. शिराळा) येथे तसेच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, चरण, धनगरवाडा येथे पहिल्या अतिवृष्टीची नोंद झाली आहे. धरण ५० टक्के भरले असून १३ हजार ८३१ क्युसेकने पाण्याची आवक तर ४०० क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. एका दिवसात एक टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तालुक्यातही दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

परिसरातील नदी, नाले, तलाव, धरणामध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. २४ तासात चांदोली धरण परिसरात ६७ मिलिमीटर, पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे १५६ मिलिमीटर, निवळे येथे १५२, धनगरवाडा १०९, चरण ७१.८० याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. बुधवारी दुपारी दोन नंतर पावसाचा जोर मंदावला होता. गेले तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चांदोली धरणात एका दिवसात १.१६ टीएमसीने वाढ झाली आहे.

२४ तासातील पाऊस (मिमी)

चांदोली- ६७ (४८८)
पाथरपुंज- १५६ (१४६८)
निवळे - १५२ ( १३४४)
धनगरवाडा - १०९ (६९४ )
कोकरूड - ३५.८०
शिराळा - २४
शिरशी - ३०
मांगले - २३
सागाव - ३३
चरण - ७१.८०

चांदोली धरणसाठा - १७.११ टीएमसी (४९.७४ टक्के)
उपयुक्त पाणीसाठा - १०.२३ टीएमसी (३७.१७ टक्के)
पाण्याची आवक १३८३१ क्युसेक
विसर्ग - ४०० क्युसेक

शिराळा तालुक्यातील पाणीसाठा

मोरणा धरण - १३ टक्के (गतवर्षी १०० टक्के)
करमजाई - ४२ टक्के (गतवर्षी १०० टक्के)
अंत्री बुद्रुक - १० टक्के (गतवर्षी १०० टक्के)
शिवणी - कोरडा (गतवर्षी ५१ टक्के)
टाकवे - कोरडा (गतवर्षी ६५ टक्के)
रेठरे धरण- कोरडा (गतवर्षी ८५ टक्के)
कार्वे - कोरडा (गतवर्षी १९ टक्के)

Web Title: Heavy rains in Sangli district, Chandoli Dam is 50 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.