सांगली जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, गारपिटीचाही फटका; द्राक्षबागांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:04 IST2025-04-02T16:03:52+5:302025-04-02T16:04:47+5:30

सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह मंगळवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील काही भागांत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी ...

heavy rains in Sangli district Vineyards damaged | सांगली जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, गारपिटीचाही फटका; द्राक्षबागांचे नुकसान

सांगली जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले, गारपिटीचाही फटका; द्राक्षबागांचे नुकसान

सांगली : ढगांचा गडगडाट अन् मेघगर्जनेसह मंगळवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील काही भागांत उन्हाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावात गारपीट झाली असून शिराळा, पलूस, कडेगाव व खानापूर तालुक्यातील काही गावात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसाने द्राक्ष व बेदाणा उत्पादकांची चिंता वाढली आहे. तसेच, आंब्याच्या बागांनाही फटका बसला आहे.

सांगली जिल्ह्यात मंगळवारी दुपारी उन्हाच्या तीव्र झळांचा सामना नागरिकांना करावा लागला. त्यामुळे ३७ अंशांवर पारा गेला होता. मंगळवारी दुपारनंतर वारे सुरू झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाल्याने दिवसभर उकाड्याने नागरिक त्रस्त होते. दुपारनंतर जिल्ह्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण होते. दुपारी चारनंतर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. पलूस, शिराळा, तासगाव व कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी सरी बरसल्या. खानापूर तालुक्यातील विटा परिसरात उन्हाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

उकाड्याने त्रस्त नागरिकांना पावसाने दिलासा दिला असला, तरी काही भागांत शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी व गुरुवारी सायंकाळीही मेघगर्जनेसह मोठ्या पावसाचा अंदाज आहे. तासगाव तालुक्यात मणेराजुरी व विसापूर येथे जोरदार गारपीट झाली. उर्वरित तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. शिराळा तालुक्यातील चरण परिसरात चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह उन्हाळी पाऊस पडला. पलूस तालुक्यातील दुधोंडी आणि घोगाव, दह्यारी, तुपारी, नागराळे, पुणदी परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.

सांगली, मिरज शहरात ढगांची दाटी

सांगली, मिरज शहरात मंगळवारी सायंकाळी पाचनंतर ढगांची दाटी झाली होती. शहर व परिसरात पावसाचा हलकासा शिडकावा झाला. दिवसभर शहरात तीव्र उन्हाच्या झळांनी नागरिकांना हैराण केले होते.

तिन्ही तालुक्यात शेतकऱ्यांची धांदल

पावसामुळे मंगळवारी सायंकाळी शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. तासगाव तालुक्यात अनेक ठिकाणी द्राक्ष बागायतदारांनी बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारले आहेत. अवकाळी पावसाचे संकट वाढवल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी कडबा सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव सुरु होती.

रात्रीचा उकाडा वाढला

जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान ३७ अंशांवर गेले असताना किमान तापमानाचा आलेखही वाढत आहे. मंगळवारी किमान तापमान २४.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअसच्या घरात असल्याने रात्रीचा उकाडाही वाढला आहे.

Web Title: heavy rains in Sangli district Vineyards damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.