शिराळ्यासह वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी; अनेक पूल पाण्याखाली
By अशोक डोंबाळे | Published: August 9, 2022 08:22 PM2022-08-09T20:22:47+5:302022-08-09T20:23:22+5:30
वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: शिराळा तालुक्यासह कोयना, वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. शिराळा तालुक्यात ७० मिलीमीटर तर वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात १३० आणि कोयना धरण क्षेत्रात १७५ मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले असून कृष्णा दुथडी भरून वाहत आहे.
जिल्ह्यात चार दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दिवसभरात वारणा धरण क्षेत्रात ३७, तर कोयना धरण क्षेत्रात ९२ मिलीमीटर पाऊस झाला. वारणा धरणात ३०.५३ टीएमसी पाणीसाठा असून ८९ टक्के धरण भरले आहे. यामुळे धरणातून पाच हजार ६२८ क्युसेकने विसर्ग होत आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरण ७२ टक्के भरले आहे. कोणत्याही क्षणी विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असल्यामुळे कृष्णा नदीची पातळी दिवसात नऊ फुटांनी वाढून मंगळवारी सायंकाळी आयर्विन पूल येथे १९ फूट झाली होती. वाळवा, पलूस, मिरज, कडेगाव, जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यांमध्येही जोरदार पाऊस सुरू आहे.
अलमट्टीतून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग- अलमट्टी धरणात ७९ हजार ४९२ क्युसेकने पाण्याची आवक होत असून ११७.३७ टीएमसी म्हणजे ९४.४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामुळे त्यातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे.
कृष्णा नदीची जिल्ह्यातील पाणीपातळी (फूट इंचामध्ये)
कृष्णा पूल कराड- १३.०९
ताकारी- २२.०३
भिलवडी पूल- २१.०१
आयर्विन- १९
अंकली- २३.०६
म्हैसाळ- ३१
राजापूर बंधारा- ३२.११
धरणातील पाणीसाठा
धरण - क्षमता - सध्याचा पाणीसाठा - टक्केवारी
अलमट्टी - १२३ - ११७.१९ - ९४.४६ टक्के
कोयना - १०५.२३ - ७५.४८ - ७२ टक्के
वारणा ३४.२० - ३०.५३ - ८९ टक्के