मुसळधार पावसाने सांगली शहराला झोडपून काढले, दोन तासांतच ६१.५ मि.मी.ची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 04:38 PM2024-09-24T16:38:53+5:302024-09-24T16:41:57+5:30
‘सिव्हिल’ चौकात वाहतूक कोंडी
सांगली : शहर व परिसरात रविवारी रात्री ६१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मिरज तालुक्यात सर्वाधिक पाऊससांगली शहरात पडला असून, शहरातील प्रमुख रस्ते, चौक अन् उपनगरांना पडलेला पाण्याचा विळखा साेमवारीही घट्ट राहिला.
ढगांच्या गडगडाटासह रविवारी रात्री मुसळधार पावसाने सांगली शहराला झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत पाऊस कायम होता. दोन तासांतच ६१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शहर जलमय झाले. सोमवारी सकाळी पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने सांगलीतील अनेक भाग पाण्यातच राहिले.
सांगलीच्या शासकीय रुग्णालयासमोरील रस्ता, काँग्रेस भवन, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाच्या पूर्व बाजूचा उत्तर शिवाजीनगरचा रस्ता, रतनशीनगर, जुना बुधगाव रस्ता, शिवाजी मंडई, लक्ष्मी देऊळ परिसर, महात्मा गांधी कॉलनी, आदी भागातील रस्ते, चौक पाण्यात गेले. सोमवारी दिवसभर या भागातील पाणी कायम होते. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना साचलेल्या पाण्यातून कसरत करीत शाळा गाठावी लागली.
‘सिव्हिल’ चौकात वाहतूक कोंडी
सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोरील चौकात सोमवारी दुपारी वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. वीस मिनिटे वाहतूक ठप्प होती. शासकीय रुग्णालयापासून शंभर फुटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली.
नाले, गटारींवर अतिक्रमणांचा परिणाम
सांगलीत अनेक रस्ते तसेच उपनगरांमधील गटारी, नाल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे पावसाळी पाणी निचरा होण्यास अडथळे येत आहेत. जुना बुधगाव रस्ता, महात्मा गांधी काॅलनी, कुपवाड रोडला यामुळे पाणी साचून राहण्याची समस्या निर्माण झाली आहे.
कुठे किती पाऊस? (मि.मी.)
सांगली ६१.५
बुधगाव ५७
कवलापूर २९.८
कसबे डिग्रज ५७
कवठेपिरान ५७.८
कुपवाड ५९