सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; नदी-नाल्यांना पूर, गावांचे संपर्क तुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 01:27 PM2024-06-10T13:27:00+5:302024-06-10T13:27:15+5:30
सांगली : जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी मध्यरात्री व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नद- नाले व ओढ्यांना ...
सांगली : जिल्ह्याच्या अनेक भागात शनिवारी मध्यरात्री व रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. नद- नाले व ओढ्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी गावांचे संपर्क तुटले आहेत. शेतशिवारालाही तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे जिल्ह्याच्या काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मिरज तालुक्यासह तासगाव तालुक्याला पावसाने झोडपले. मिरज तालुक्यातील मालगाव रस्त्यावरील ओढ्याला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली तर कसबे डिग्रज ते नांद्रे रस्ताही पाण्यामुळे बंद झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीत पाणी साचून राहिले. या पावसामुळे येरळा व अग्रणी नदीला पूर आला. नदीपात्रातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. सांगली शहरालाही शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले असून शहर जलमय झाले आहे. सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने नदीतील बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे.