वारणा धरण क्षेत्रात दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 05:38 PM2020-08-05T17:38:44+5:302020-08-05T17:44:24+5:30
सांगली जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाने हजेरी लावली असून वारणा धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टीची नोंद झाली आहे,
सांगली : जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाने हजेरी लावली असून वारणा धरण क्षेत्रात सलग दुसºयादिवशी अतिवृष्टीची नोंद झाली. कोयना धरण परिसरातही अतिवृष्टी सुरू असून कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सकाळपर्यंत सांगली जिल्ह्यात सरासरी २५.४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
सांगली जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस बुधवारीही कायम होता. बुधवारी पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस आहे. शिराळा तालुक्यात अतिवृष्टी नोंदली गेल्याने वारणा नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सायंकाळपर्यंत पावसाची संततधार चालूच होती. ढगांची दाटी कायम असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून त्यानंतर जोर कमी होणार आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदल्या गेलेल्या चोवीस तासातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी २५.४३ मिलिमीटर पाऊस झाला. मिरज तालुक्यात २९.९, तासगावमध्ये १८, कवठेमहांकाळमध्ये १४.४, वाळवा-इस्लामपूरमध्ये २९, शिराळ्यात ७९.७, कडेगावमध्ये ३0, पलूसला २0.८, खानापूर-विटा येथे १३.६, आटपाडीत १.७, जतमध्ये ४.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे.
वारणा धरणात सध्या २६.३३ म्हणजेच ७६.५२ टक्के पाणीसाठा झाला असून कोयना धरणात ६0.२८ म्हणजेच ५७.२७ टक्के पाणीसाठा आहे. वारणा धरणातून ९५0 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
कोयना धरणातून पाणी सोडलेले नाही. कोयना धरण क्षेत्रात बुधवारी दुपारी १४0 मिलिमीटर, तर कोयना धरण क्षेत्रात २४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा हा जोर कायम राहिल्यास धरणातून विसर्ग सुरू होण्याची चिन्हे आहेत.
सांगलीजलमय
सांगली, मिरज शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने ही शहरे जलमय झाली आहेत. प्रमुख रस्ते, चौक व सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. शहराच्या गुंठेवारी भागातही दलदल निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. अनेक ठिकाणी महापालिकेने मुरुम टाकला नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.