शिराळा पश्चिम भागात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:18 AM2021-07-22T04:18:03+5:302021-07-22T04:18:03+5:30
फोटो : कोकरूड (ता. शिराळा) येथे वारणा नदीवरील कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे. लोकमत न्यूज नेटवर्क कोकरूड : शिराळा ...
फोटो : कोकरूड (ता. शिराळा) येथे वारणा नदीवरील कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरूड : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळत असून, वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. मंगळवारी सायंकाळपासून कोकरूड-रेठरे बंधारा आणि येळापूर-समतानगर पूल पाण्याखाली गेला आहे. परिसरात शेतातून पाणीच पाणी वाहत असल्याने काही ठिकाणी शेतीचे बांध फुटले आहेत.
शिराळा पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या मोठ्या सरी कोसळत असल्याने वारणा नदीची पाणीपातळी वाढली आहे. बुधवारी सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे कोकरूड-रेठरे बंधारा पाण्याखाली गेल्याने रेठरे, गोंडोली, भराडवाडी, जांभळेवाडी येथील लोकांना चरण, नेर्लेमार्गे प्रवास करावा लागत आहे.
पश्चिम भागातील बिळाशी, कोकरूड, शेडगेवाडी, चरण, आरळा, मणदूर, गुढे, पाचगणी, येळापूर, मेणी परिसरातील शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सर्व ओढे, नाले भरून वाहत आहेत. मेणी ओढ्यावर असणाऱ्या येळापूर येथील येळापूर-समतानगर पुलावर बुधवारी दुपारपासून पाणी असल्याने समतानगर, दीपकवाडी कांबळेवाडी, हाप्पेवाडी येथील नागरिकांना एक-दोन किलोमीटरवरून फिरून जावे लागले.