सांगली, मिरजेसह जिल्ह्यात जोरदार सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:18 AM2021-07-19T04:18:06+5:302021-07-19T04:18:06+5:30
सांगली : सांगली, मिरज परिसरात शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. ढगांची दाटी कायम असून येत्या दोन ...
सांगली : सांगली, मिरज परिसरात शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. ढगांची दाटी कायम असून येत्या दोन दिवसांत मोठ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता नोंदलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खानापूर तालुक्यात ३९ मि.मी. इतका सर्वाधिक पाऊस नोंदला गेला. मिरज तालुक्यात १८, जतमध्ये १९.१, वाळवा-इस्लामपूरला ५, तासगावला १९.२, शिराळ्यात ८.४, आटपाडीत ०.४, कवठेमहांकाळला ३२, पलूसला ९, कडेगावला २१.२ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला.
सांगली, मिरज शहरात शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १९ जुलै रोजी मुसळधार पावसाची चिन्हे आहेत. त्यानंतर चार दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. रविवारी दिवसभर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी केवळ ढगांची दाटी असे वातावरण होते.