पलूसकरांसाठी विजापूर-गुहागर मार्गाने नरकयातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:35+5:302021-03-20T04:25:35+5:30
फोटो ओळ : पलूस तालुक्यात विजापूर-गुहागर मार्गावरील घोगाव ते येळावी फाट्यापर्यंतचा रस्ता खड्ड्यांमुळे जीवघेणा बनला आहे. आशुतोष कस्तुरे पलूस ...
फोटो ओळ : पलूस तालुक्यात विजापूर-गुहागर मार्गावरील घोगाव ते येळावी फाट्यापर्यंतचा रस्ता खड्ड्यांमुळे जीवघेणा बनला आहे.
आशुतोष कस्तुरे
पलूस : पलूस तालुक्यात सुरू असणारे विजापूर-गुहागर महामार्गाचे काम नागरिकांसाठी मरणयातना बनले आहे. तालुक्यात गत तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. यामुळे यामध्ये नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात या रस्त्याचे काम काही ठिकाणीच सुरू झाले; पण ठेकेदाराने पूर्वीचा रस्ता नुसता उकरून ठेवला आहे. त्यावर नवीन रस्ता करणे दूरच; उकरलेल्या रस्त्यावरील खड्डेसुद्धा नीट भरून घेतले नाहीत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी पॅचवर्क केले; तेही इतके निकृष्ट होते की काही दिवसांतच ते गायब झाले. आता एखादे अवजड वाहन रस्त्यावरून गेल्यावर धुळीचे साम्राज्य वाढत, पसरत आहे. दुचाकीस्वारांना यामुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या रस्त्यावर कऱ्हाड, ताकारी, कुंडल, पलूस, बांबवडे, तासगाव, सांगली अशी मोक्याची गावे असल्याने मोठी वाहतूक होत असते. दह्यारी फाट्यापासून घोगाव, कुंडलपर्यंतच्या काही भागांत रस्ता उकरून ठेवला आहे. काम अद्याप अपुरे आहे.
कोट
या रस्त्याबाबत आम्ही न्यायालयात दाद मागितली आहे. तो प्रश्न अजून न्यायप्रविष्ट आहे; परंतु तोपर्यंत पॅचवर्क करणे आवश्यक आहे.
- सुधीर जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष
चौकट
शेतकऱ्यांनी दिलेले निवेदन संबंधित विभागाकडे पाठविले आहे. मे महिनाअखेर हा रस्ता पूर्ण करण्याची विनंती त्यांना केली आहे.
- निवास ढाणे, तहसीलदार, पलूस
कोट
या खराब रस्त्यामुळे बाहेरील व्यापारी पलूसला येण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे आर्थिक घडी विस्कळीत होत आहे. हा रस्ता तत्काळ होणे आवश्यक आहे.
- वैभवराव पुदाले, अध्यक्ष, पलूस सहकारी बँक