वीर जवान, तुझे सलाम!

By Admin | Published: November 2, 2016 12:11 AM2016-11-02T00:11:41+5:302016-11-02T00:11:41+5:30

दुधगावकरांची मानवंदना : रात्रीत उभारले फलक, गावभर उमटल्या रांगोळ्या

Hello, mighty man! | वीर जवान, तुझे सलाम!

वीर जवान, तुझे सलाम!

googlenewsNext

सचिन लाड ल्ल सांगली
दुधगाव हे सांगलीपासून १५ किलोमीटरवरचे गाव. वारणा नदीकाठी वसलेल्या पंधरा हजार लोकवस्तीच्या दुधगावने गावचा सुपुत्र नितीन कोळी यांना गमावले, मात्र देशासाठी लढताना नितीन यांना वीरमरण आल्याचा गावाला अभिमान आहे. या वीर जवानाने गावाची मान उंचावल्याने त्यांना मानवंदना देताना ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवले. ऐन दिवाळीत तीन दिवसांचा दुखवटा पाळला. दोन दिवसात स्मशानभूमीपर्यंतच्या एक किलोमीटर रस्त्याचे मुरमीकरण केले. महिलांनी अंत्ययात्रेच्या मार्गवर रात्रभर रांगोळ्या काढल्या.
सीमा सुरक्षा दलात केवळ आठ वर्षे सेवा झालेल्या नितीन कोळी यांना शुक्रवारी रात्री पाकिस्तानच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीवेळी वीरमरण आले. अत्यंत गरीब परिस्थितीत नितीन यांनी शिक्षण घेतले. सैन्यात भरती होण्याची त्यांची जिद्द वडिलांनी पूर्ण केली. कुटुंबाचा आधार असलेला नितीन अचानक निघून गेल्याच्या बातमीवर त्यांच्या कुटुंबीयांना अजूनही विश्वास बसत नाही. वडील सुभाष कोळी व भाऊ उल्हास यांनाच नितीन शहीद झाल्याचे माहीत होते. आई सुमन व पत्नी संपदा यांना मात्र नितीन यांना गोळी लागल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे गावात दोन दिवस कोणीही नितीन यांना श्रद्धांजली वाहणारे फलक लावले नव्हते.
गावचा सुपुत्र शहीद झाला. अंत्ययात्रेसाठी लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी आणि जिल्हाभरातून लोक येणार असल्याने शनिवारी ग्रामस्थांची बैठक झाली. त्यात नियोजन ठरले. पावसामुळे स्मशानभूमीपर्यंत जाणारा रस्ता खचला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी शनिवार आणि रविवारी दिवस-रात्र थांबून मुरुम टाकून रस्ता करून घेतला. सोमवारी सकाळी पार्थिव येणार असल्याने सर्वांनी रविवारची रात्र जागूनच काढली. महिलांनी वारणा नदीकाठी असलेल्या स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्यासह इतर रस्त्यांवर रांगोळ्या काढल्या. अंत्ययात्रेच्या मार्गावर फुलांची रांगोळी काढण्यात आली. रात्री बारानंतर रांगोळ्या काढण्यास सुरुवात झाली. हे काम काम पहाटे पूर्ण झाले.
कर्मवीर भाऊराव पाटील चौकात दोन डझनभरश्रद्धांजलीपर फलक उभे करण्यात आले. अंत्ययात्रेच्या मार्गावरही फलक लावले गेले. गावात प्रवेश केल्यानंतर नितीन कोळी यांना श्रद्धांजली वाहणारा फलक नजरेस पडला. त्यासमोर मोठी रांगोळी काढण्यात आली होती. यामध्ये भारताचा नकाशा रेखाटला होता.
पार्थिव सकाळी येण्यापूर्वीच गावात येणाऱ्या प्रमुख मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. तेथेच पार्किंगची व्यवस्था केली होती. महिलांनी नितीन कोळी यांच्या घरासमोर गर्दी केली होती.
कर्मवीर चौकात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असल्याने सकाळी सहापासून ग्रामस्थांनी गर्दी केली होती. नितीन यांच्या घरी नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता. कर्मवीर चौकात ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
पितृछत्र हरपले : मुले कावरी-बावरी
खेळण्या-बागडण्याच्या वयातच देवराज (वय ४ वर्षे) व युवराज (२ वर्षे) यांच्यावरील पितृछत्र हरपले. आपले वडील सैन्यात आहेत, एवढेच त्यांना माहीत होते. मात्र ते शहीद झाले, याबद्दल ते अनभिज्ञ होते. पार्थिव घरी आल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश सुरू केला, त्यावेळी मुले कावरी-बावरी झाली होती. नातेवाईकांनी या दोन्ही चिमुरड्यांना जवळ घेतले. स्मशानभूमीतही युवराजला त्याची आई संपदा यांनी जवळ घेतले होते. एवढ्या लहान वयात पित्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आलेल्या देवराजला अंत्यसंस्कार म्हणजे काय, याची कल्पनाही नव्हती. चुलते उल्हास यांनी देवराजला आधार देत अंत्यसंस्काराचा विधी पार पाडला.
शिस्तबद्ध नियोजन
ग्रामस्थांनी नितीन कोळी यांच्या अंत्यसंस्काराचे नियोजन शिस्तबद्धरित्या केले होते. स्मशानभूमीत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना वार्तांकन करण्यासाठी तीन ट्रॉलींची सोय केली होती. उन्हामुळे कोणाला त्रास झाल्यास वैद्यकीय पथक तसेच रुग्णवाहिकेची सोय केली होती. ध्वनिक्षेपकावरून नियोजन सांगितले जात होते.
 

 

Web Title: Hello, mighty man!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.