पूरबाधितांसाठी ‘एनडीआरएफ’च्या नियमांपेक्षा पुढे जाऊन मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:49+5:302021-07-31T04:26:49+5:30
अंकलखोप : पूरबाधित क्षेत्रासाठी एनडीआरएफच्या नियमानुसार किंवा त्यापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचे विचाराधीन आहे, मदतकार्य पंचनाम्यानंतर लवकरच सुरू होईल, ...
अंकलखोप : पूरबाधित क्षेत्रासाठी एनडीआरएफच्या नियमानुसार किंवा त्यापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचे विचाराधीन आहे, मदतकार्य पंचनाम्यानंतर लवकरच सुरू होईल, असे आश्वासन कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दिले.
ते पलूस तालुक्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. औदुंबर (ता. पलूस) येथील दत्त मंदिर परिसरात आ. अरुण लाड आणि क्रांती उद्योग समूहामार्फत सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेवेळी ते बोलत होते.
आ. पवार म्हणाले, ‘‘पुरामुळे नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरू झाले आहेत. तद्नंतर लगेचच मदत पोहोचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे. अनेक नेतेमंडळी पूरपरिस्थितीचा फक्त आढावा घेतात; पण क्रांती उद्योग समूहाने पूरपट्ट्यात सर्व प्रकारची सुविधा देण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. वैद्यकीय सुविधा, जेवण, राहण्याची सोय, पशुधनाला चाऱ्याची सोय करून त्यांनी क्रांतीचा वारसा जोपासला आहे. आ. अरुण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड आदर्श निर्माण करीत आहेत.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मोहन पाटील, जिल्हा परिषद नितीन नवले, युवती अध्यक्ष पूजा लाड, नंदा पाटील, अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते, उपसरपंच स्वाती पाटील, मृणाल पाटील, उदय पाटील, घनश्याम सूर्यवंशी, धनंजय पाटील, क्रांतीचे उपाध्यक्ष उमेश जोशी उपस्थित होते.