‘म्हैसाळ’ला टंचाईतूनच मदत करा
By admin | Published: January 10, 2016 11:05 PM2016-01-10T23:05:28+5:302016-01-11T00:46:19+5:30
पतंगराव कदम : तिजोरीत कधीच खडखडाट नसतो
सांगली : राज्याच्या तिजोरीत कधीच खडखडाट नसतो. दररोज शासनाकडे पैसा येत असतो. त्यामुळे टंचाईतून म्हैसाळ योजनेला पैसा देणे शक्य आहे. दुष्काळी परिस्थितीचा विचार करून शासनाने योजनेला मदत केली पाहिजे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी रविवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
ते म्हणाले की, देशात आणि राज्यात सध्या वेगळे वातावरण आहे. दुष्काळ आणि पाणीप्रश्न तसेच प्रलंबित आहेत. लोकांना काय कळायचे ते कळलेले आहे. ‘म्हैसाळ’च्या प्रश्नावर सरकारनेच उपाय शोधला पाहिजे. आमच्या काळात टंचाईतून योजनांची बिले भागविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये घेतला होता. आताच्या सरकारनेही याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेऊन म्हैसाळ योजनेस मदत करावी. ताकारी योजनेची परिस्थिती वेगळी आहे. याठिकाणी कारखान्यांनी ऊस बिलातून वसुली करून योजनांची बिले भागविली. ‘म्हैसाळ’च्या परिस्थितीचा अभ्यास करून याठिकाणी उपाय शोधले पाहिजेत.
सहकारी संस्थांची जी संचालक मंडळे बरखास्त झाली आहेत, त्यांची प्रथम चौकशी झाली पाहिजे. चौकशीत ते त्या भ्रष्टाचाराला जबाबदार असतील, तरच त्यांच्याविषयीचा पुढील निर्णय घ्यावा. सहकारी संस्थांमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा पाया रचला गेला. त्यामुळे या संस्था टिकल्या पाहिजेत, त्यादृष्टीने निर्णय घेतले पाहिजेत. त्या मोडीत निघतील, अशापद्धतीने धोरण राबविणे चुकीचे ठरेल.
मी सहकारमंत्री असताना कोणत्याही संस्था बरखास्त केल्या नाहीत. काही बँकांच्या बरखास्तीचा निर्णय नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार झाला होता. सहकार चळवळ अधिक मजबूत व्हावी, असे धोरण आम्ही स्वीकारले होते, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
...तर स्वबळावर
आगामी जिल्हा परिषद तसेच नगरपालिकांच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू. राष्ट्रवादीला सोबत येण्याची विनंती केली जाईल. ते सोबत आले तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढू, असे पतंगराव कदम म्हणाले.