राष्ट्रवादीसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: October 19, 2015 11:02 PM2015-10-19T23:02:24+5:302015-10-20T00:17:25+5:30
इस्लामपूर सभागृह नामकरण प्रश्न : वसंतदादांचे नाव पुसले जाणार नाही : रवींद्र बर्डे
अशोक पाटील - इस्लामपूर वाळवा तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारतीतील सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला आहे. ठरावाप्रमाणे नाव देऊच, शिवाय वसंतदादांचा अवमान न करता जुन्या सभागृहाला दिलेले त्यांचे नाव तसेच ठेवू. त्यामुळे नामांतराचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका सभापती रवींद्र बर्डे यांनी घेतली आहे. याउलट राजारामबापू हे राष्ट्रीय नेते अथवा थोर पुरुष नसल्याचा पुरावा देऊन, त्यांचे नाव नूतन सभागृहाला देता येत नाही, अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दृष्टीने हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनला आहे.
माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून इस्लामपूर मतदारसंघात सर्वच शासकीय, निमशासकीय इमारतींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून वाळवा पंचायत समितीची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीतील सभागृहाला राजारामबापू पाटील यांचे नाव देण्याचा ठराव करण्यात आला. परंतु त्याला काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी विरोध केला. सभागृहाला दिलेले पूर्वीचे वसंतदादा पाटील यांचे नाव तसेच ठेवावे, असा आग्रह त्यांनी धरला आहे. परंतु त्यांच्या आग्रहाला सत्ताधाऱ्यांनी जुमानले नाही. यामुळेच या प्रश्नात जि. प. सदस्य सम्राट महाडिक यांनी लक्ष घालून सभागृहावर वसंतदादांच्या नावाचा फलक लावला. या प्रश्नावर रवींद्र बर्डे यांनी तोडगा काढला आहे. ते म्हणतात, ‘आम्ही वसंतदादांचा आदर करतो. जुन्या इमारतीतील सभागृहाचे नाव आम्ही तसेच ठेवणार आहोत. नवीन इमारतीतील सभागृहाला राजारामबापूंचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.’
नामांतराचा प्रश्न प्रकाश पाटील यांनी तडीस लावण्याचे ठरवले आहे. त्यांनी कायदेशीर मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची कागदपत्रे माहितीच्या अधिकाराखाली गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे हा प्रश्न दोन्ही काँग्रेसच्या प्रतिष्ठेचा बनला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी दोन्ही नेत्यांच्या नावावरून सुरु असलेला वाद मिटविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
शासनाचे पत्रक : नेमके काय?
प्रकाश पाटील यांनी प्राप्त केलेल्या शासन आदेशात, शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये थोर नेते, राष्ट्रपुरुष यांचे छायाचित्र लावण्याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये २१ जणांच्या नावांचा समावेश आहे. त्यात वसंतदादा पाटील यांचे नाव आहे. मात्र राजारामबापू पाटील यांचे नाव नाही. प्रकाश पाटील हा शासनआदेश सभागृहाच्या नामांतर प्रश्नासाठी वापरत आहेत. वास्तविक तो आदेश छायाचित्राबाबत आहे.
नामांतराच्या प्रश्नाला गटविकास अधिकारी जबाबदार
गटविकास अधिकारी हे पद शासन आणि जनतेमधील दुवा आहे. हेच अधिकारी सत्ताधाऱ्यांपुढे हतबल झाले आहेत. ही प्रशासकीय इमारत बांधकाम विभागाकडून हस्तांतरित झालेली नाही, असे गटविकास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मग १ एप्रिल २0१५ रोजी त्यांनी उद्घाटन कार्यक्रम कसा घेतला? तसेच नवीन इमारतीतील अंतर्गत कार्यालये सुरु करण्याचा त्यांना काय अधिकार? नामांतराच्या प्रश्नालाही सर्वस्वी गटविकास अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोप पेठ येथील पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील यांनी केला आहे.