Sangli News: वास्तुशांतीचा खर्च टाळून केली अनाथाश्रमाला मदत, करगणीच्या शिक्षक दाम्पत्यांचा कौतुकास्पद निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 05:48 PM2023-01-04T17:48:31+5:302023-01-04T17:48:31+5:30
नूतन वास्तू गृहप्रवेशाच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीला बगल
लक्ष्मण सरगर
आटपाडी: सद्या समाजापुढे दिखाव्यासाठी लाखो रुपये खर्च करून वाहवा मिळविण्यासाठी काही लोक मागे पुढे पाहत नाही. मात्र या सगळ्यांना छेद देत माणुसकी जपण्याचे काम आटपाडी तालुक्यातील करगणी गावच्या संतोष क्षीरसागर व अंजली क्षीरसागर या शिक्षक दाम्पत्यांनी केले आहे. आपल्या नव्या घराच्या वास्तुशांती समारंभाचा खर्च टाळून तो अनाथाश्रमाला दान देत माणुसकी भक्कम केली.
क्षीरसागर कुटूंब नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते. संतोष क्षीरसागर हे जि. प.शाळा काळेवाडी येथे कार्यरत आहेत. तर त्याच्या पत्नी अंजली क्षीरसागर या जि. प.शाळा अहिल्यानगर हिवतड येथे कार्यरत आहेत. या शिक्षक दाम्पत्यांनी नूतन वास्तू गृहप्रवेशाच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीला बगल देत जेवणावळी, आहेर - माहेर, भेटवस्तू अशा गोष्टींना फाटा देत वास्तुशांती समारंभाच्या निमित्ताने संवेदना चॅरिटेबल ट्रस्ट सांगलीचे संचालक डॉ. दिलीप शिंदे यांना २५००० हजार रुपये तसेच मिरज येथील पाठक अनाथ आश्रमाला सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त व बालिका दिनाचे औचित्य साधून २५००० रुपये देणगीचा चेक देऊन एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.
"संवेदना" ट्रस्ट ला देणगी देत माणुसकीची "संवेदना" जागवणाऱ्या क्षीरसागर दाम्पत्याचा खऱ्या अर्थाने अभिमान वाटावा असे कार्य केल्याची भावना अनेक कृतीशील समाज बांधवांकडून व्यक्त होत आहे.