पूरपट्ट्यात विटा पालिकेचा स्वच्छतेसाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:27 AM2021-07-31T04:27:02+5:302021-07-31T04:27:02+5:30
विटा : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सातत्य ठेवून ‘स्वच्छ विटा.. सुंदर विटा’चा संदेश देशभर पोहोचविलेल्या विटा नगरपालिकेने महापुराच्या संकटात सापडलेल्या ...
विटा : स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सातत्य ठेवून ‘स्वच्छ विटा.. सुंदर विटा’चा संदेश देशभर पोहोचविलेल्या विटा नगरपालिकेने महापुराच्या संकटात सापडलेल्या कृष्णा काठावरील गावांना स्वच्छतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक पलूस तालुक्यातील आमणापूर व परिसरातील गावांमध्ये विविध वाहनांच्या ताफ्यासह सक्रिय झाले आहे. या कर्मचाऱ्यांनी कृष्णाकाठावरील महापूरबाधित गावांत स्वच्छतेचे काम सुरू केले आहे.
आठ दिवसांपूर्वी कृष्णा नदीला आलेल्या महापुराने नदीकाठावरील गावांचे मोठे नुकसान झाले आहे. महापुराचे पाणी गावात, तसेच लोकांच्या घरात शिरल्याने अनेकांना स्थलांतरित व्हावे लागले; परंतु महापुराच्या संकटापेक्षा पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेचे मोठे आव्हान लोकांसमोर उभे राहिले आहे.
त्यामुळे महापूरबाधित गावांतील स्वच्छतेसाठी विटा नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे कर्मचारी कृष्णाकाठावरील विविध गावांत दाखल झाले आहेत. त्यांनी प्रत्यक्षात स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. महापूरबाधित गावांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतेसाठी लागणारे पाणी आणण्यासाठी पालिकेचे टॅँकर, कचरा वाहक गाड्या यासह विविध वाहने पाठविण्यात आली आहेत.
विटा शहरात स्वच्छतेचा कानमंत्र देऊन शहर स्वच्छतेत देशात अव्वल आणणारे आरोग्य व स्वच्छता विभागाचे कर्मचारी महापूरबाधित गावातील स्वच्छतेसाठी झपाटून काम करीत आहेत. विटा नगर परिषदेने पूरग्रस्त भागात स्वच्छतेसाठी मदतीचा हात दिल्याने पूरग्रस्तांना माेठा दिलासा मिळाला आहे.
फोटो - ३००७२०२१-विटा-नगरपालिका टीम : विटा नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून आमणापूर परिसरासह महापूरबाधित गावांत स्वच्छता केली जात आहे.