‘व्हॉटस्-अॅप ग्रुप’ची आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत
By admin | Published: February 9, 2016 12:11 AM2016-02-09T00:11:05+5:302016-02-09T00:15:55+5:30
आर्थिक पाठबळ : शासकीय मदतीपासून वंचित असणाऱ्यांना दिलासा
संख : समाजात मीडियाचा दुरुपयोग होत असल्याच्या अनेक घटना घडतात. मात्र कायम दुष्काळी जत येथील व्हॉटस्-अॅप गु्रपने सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबविला आहे. तालुक्यातील दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ३० हजाराची मदत केली आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठीदेखील करता येऊ शकतो, याचा प्रत्यय आणून देण्यात आला.
पावसाअभावी तालुक्यामध्ये १९७२ पेक्षाही भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे. पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची अवस्था भीषण आहे. त्यामुळे तालुक्यातील गुड्डापूर येथील रमेश पुजारी व दरीबडची येथील शेतकरी श्रीमंत चौगुले यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून आॅक्टोबर महिन्यामध्ये आत्महत्या केली. घरातील या कर्त्या व्यक्तीनेच आत्महत्या केल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले होते. अशा कुटुंबांना मदत करण्याकरिता ‘शासनाचे काम सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आजही मदत मिळालेली नाही. शासकीय नियमांच्या जंजाळात ही मदत अडकली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या उद्देशाने जतमधील आ. विलासराव जगताप व्हॉटस्-अॅप गु्रपने गु्रपच्या सदस्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला या ग्रुमपमधील अनेक सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तीस हजार रुपये जमा केले. जगताप यांच्याहस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली. यावेळी बाजार समितीचे संचालक विठ्ठल निकम, माजी पं. स. सदस्य सोमाण्णा हाक्के, मारुती पवार, सरदार पाटील, अमोल कुलकर्णी, लखन होनमारे, संदीप काशीद, योगेश शिंदे, सुभाष कांबळे, अशोक स्वामी, शशिकांत कोडग, तानाजी कोडग, अजित मुळे, मनोहर चौगुले, दिगंबर निकम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
वारसांना मदतीचा हात
व्हॉटस्-अॅपच्या माध्यमातून जमा केलेली रक्कम गुड्डापूर येथील रमेश पुजारी व दरीबडची येथील श्रीमंत चौगुले यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येकी पंधरा हजार रुपये देण्यात आली.