नको असलेले मूल देण्यासाठी आता हेल्पलाईन

By admin | Published: July 24, 2016 12:46 AM2016-07-24T00:46:45+5:302016-07-24T00:58:44+5:30

अडचणीत सापडलेल्या मातांसाठी मदतीचा हात : बालसंकुल, केएमए, महिला दक्षता समितीचा पुढाकार

Helpline to give unwanted child | नको असलेले मूल देण्यासाठी आता हेल्पलाईन

नको असलेले मूल देण्यासाठी आता हेल्पलाईन

Next

कोल्हापूर : परिस्थितीमुळे काही मातांवर आपल्या नवजात शिशूला सोडून देण्याची वेळ येते. त्यातून हे मूल काही वेळा रस्त्यावर, कधी कोंडाळ्यात, कधी उघड्यावर टाकले जाते त्यातून बाळाला इन्फेक्शन होतात, आजारपण येते, काहीवेळा असुरक्षित गर्भपात केला जातो, हे सगळे टाळण्यासाठी बालकल्याण संकुल, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, महिला दक्षता समितीच्यावतीने हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या मातांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
मे महिन्यात एका मातेने आपले नवजात अर्भक गंगावेशेत सोडले होते. प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेल्या या बाळाला इन्फेक्शन झाल्याने या मुलीला सीपीआरमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले होते. अशाच प्रकारच्या घटना वारंवार घडतात. यामुळे बाळाला इन्फेक्शन होऊन त्याचा जीव धोक्यात येतो. भ्रूणहत्या व शिशू हत्या टाळण्यासाठी व मूल टाकून देण्याच्या या घटनांना आळा बसावा यासाठी बालकल्याण संकुल, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, महिला दक्षता समितीने नको असलेले मूल आम्हाला द्या, अशी हाक दिली होती. त्याचे पुढचे पाऊल म्हणून या संस्थांच्या पुढाकारातून हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटल, दवाखाने, लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये तसेच मेडिकलमध्येही हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहे. याशिवाय एसटी स्टॅन्ड, सार्वजनिक ठिकाणीही नंबरचे पत्रक चिकटवण्यात आले आहे.
बालकल्याण संकुलातर्फे अनाथ बालकांचे संगोपन व पुनर्वसन केले जाते. तसेच अडलेल्या महिलेला विनाअट प्रवेश दिला जातो. संस्थेने आजवर २०० हून अधिक बालकांना दत्तक देऊन त्यांचे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे ज्या पालकांना मूल नको असेल, त्यांनी ते रस्त्यावर किंवा उघड्यावर टाकण्याऐवजी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून या घटनेबद्दलची पूर्ण गुप्तता पाळली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Helpline to give unwanted child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.