Sangli: वनविभागाच्या परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईलने कॉपीचा प्लॅन आखला, अधिकाऱ्यांनी हेरून डाव उधळला
By शरद जाधव | Published: August 8, 2023 01:12 PM2023-08-08T13:12:19+5:302023-08-08T13:12:54+5:30
असा होता कॉपीचा प्लॅन
शरद जाधव
सांगली : चप्पलचे दोन भाग करून त्यात लपविलेला मोबाइल, छातीवर शर्टाचे केवळ बटण खोलले की संगणकाची स्क्रीन दिसावी अशी केलेली कॅमेऱ्याची सोय आणि दोरीने कानात अगदी आतमध्ये टाकलेला मायक्रोफोन याद्वारे कॉपी करण्याचा डाव अधिकाऱ्यांनी उधळला. वनविभागातील वनरक्षक पदाच्या भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपी करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला हेरून अधिकाऱ्यांनी त्याची कसून तपासणी केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
वनविभाग भरती परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तरुणासह त्याला मदत करणाऱ्यावर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश संजनसिंग गुमलाडू (रा. शिवगाव, ता. वैजापूर) आणि अर्जुन रतन नार्डे (रा. संजरपूरवाडी, ता. वैजापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
मेटल डिटेक्टर आणि इशारा
परीक्षार्थ्यांना आत सोडत असताना मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी केली जाते. यात अविनाश याने काळे बनियन घातले होते व त्याला छिद्र पाडून आत छोटे पॉकेट ठेवले होते. यात कॅमेरा ठेवण्यात येणार होता. मात्र, त्याअगोदरच मेटल डिटेक्टरमुळे त्याचा डाव फसला.
चप्पलचे दोन भाग
परीक्षेसाठी येणाऱ्या सर्वांना बाहेरच चप्पल काढण्यास सांगितले जाते. यातही त्याने चलाखी करून अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर दुसरीच चप्पल दाखविली. मात्र, परीक्षा झाल्यानंतर सर्वजण निघून गेल्यानंतर एक चप्पल तिथे आढळून आली. त्याची तपासणी केली असता, नवीन चप्पलचे दोन भाग केले होते. त्याच्यामध्ये मोबाइल ठेवण्यात आला होता; तर दुसऱ्या चप्पलमध्ये डिप्स्ले नसलेले डिव्हाइस ठेवण्यात आले होते.
कॉपीसाठी भन्नाट ‘डाेकॅलिटी’
मोबाइलला जोडलेले मायक्रोफोन कानात टाकण्यात आले होते. सहज तपासणीतही हे कोणाला दिसून येत नाही. अत्यंत बारीक तार अथवा दोरा गुंडाळून ते कानात टाकले जाते. अनेकदा चिमट्याद्वारेही हा मायक्रोफोन निघत नाही, इतका लहान त्याचा आकार होता.
असा होता कॉपीचा प्लॅन
परीक्षेला बसल्यानंतर सुरुवातीला मोबाइल चालू करायचा, यानंतर आपोआप कॉलिंग सुरू होणार हाेती. त्यानंतर कॉम्प्युटरची स्क्रीन छातीवरील कॅमेऱ्यासमोर आणायची. लगेचच सर्व प्रश्न बाहेर असलेल्या व्यक्तीला दिसू लागतील. तिकडून सूचना आली की केवळ पुढे-पुढे करत सर्व प्रश्न दाखविले जाणार होते. या प्रश्नांचे स्क्रीनशॉट काढून, त्यांची उत्तरे शोधून ती सांगून प्रश्न सोडविले जाणार होते.