उपमहापौर गटाची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
By admin | Published: October 18, 2016 12:34 AM2016-10-18T00:34:20+5:302016-10-18T00:52:21+5:30
महापालिका : स्थायी सभापती निवडीचा मार्ग मोकळा
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील सहा सदस्यांच्या निवडीविरोधात उपमहापौर गटातील राष्ट्रवादीच्या नगरसेविका शुभांगी देवमाने, अल्लाऊद्दीन काझी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका सोमवारी फेटाळण्यात आली. त्यामुळे आता सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सोमवारी आठ सदस्यांचा ठराव करून सभापती निवड कार्यक्रमाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या २५ अथवा २६ रोजी सभापती निवड होण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने हा दावा फेटाळला. महापालिकेच्यावतीने अॅड. वालावलकर यांनी बाजू मांडली, तर याचिकाकर्त्याच्या बाजूने अॅड. विजय किल्लेदार यांनी बाजू मांडली.
स्थायी समितीच्या सदस्य निवडीचे पुराण गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. स्वाभिमानीचे गटनेते शिवराज बोळाज यांनी यापूर्वीच एक याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल लागताच महापौर हारुण शिकलगार यांनी महासभेचा अजेंडा काढून दोन सदस्य निवडीचा विषय घेतला. हा वाद मिटण्याच्या मार्गावर असतानाच, उपमहापौर गटातील राष्ट्रवादीचे नगरसेवक अल्लाऊद्दीन काझी, शुभांगी देवमाने यांनी एक सप्टेंबरची महासभाच बेकायदेशीर असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांच्या निवडी नव्याने घ्या, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.
महापालिकेचे वकील अॅड. वालावलकर यांनीही महापालिकेची बाजू मांडली. याचिकाकर्त्यानी राज्य सरकारकडे याबाबत तक्रार करायला हवी होती.
तिथे दाद मिळाली नसती, तरच न्यायालयात दाद मागता आली असती. ते थेट न्यायालयात आले आहेत. याआधी स्थायीच्या सहा सदस्य निवडीचा ठराव महासभेने मंजूर केला आहे. यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे स्वाभिमानीचा बंद लिफाफा महासभेत उघडून दोन नावे जाहीर केल्याचे अॅड. वालावलकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने देवमाने व काझी यांचा दावाच रद्द ठरवला. (प्रतिनिधी)
दिलीप पाटील यांचे नाव निश्चित
सभापती पदासाठी सांगलीवाडीचे नगरसेवक दिलीप पाटील यांचे नाव निश्चित केले आहे. काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांनी त्यांच्या नावाला हिरवा कंदील दाखविला आहे. दिलीप पाटील यांना एक वर्षासाठी सभापतीपद दिले जाणार आहे. मदनभाऊ पाटील यांनीही दिलीप पाटील यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता बाकी आहे. मिरजेचे अतहर नायकवडी व कुपवाडच्या निर्मला जगदाळे इच्छुक असले तरी, सध्या तरी पाटील यांचेच पारडे जड आहे.