तासगावात मोठ्या गावांत होणार हाय होल्टेज ड्रामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:40 AM2020-12-16T04:40:46+5:302020-12-16T04:40:46+5:30
तासगाव : तासगाव तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या गावांत हाय होल्टेज ड्रामा रंगणार आहे. सावळज, विसापूर, येळावी, मांजर्डे, ...
तासगाव : तासगाव तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या गावांत हाय होल्टेज ड्रामा रंगणार आहे. सावळज, विसापूर, येळावी, मांजर्डे, कवठेएकंद या गावांतील लढतींकडे जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले असून या गावांतील कारभार्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. आयाराम- गयारामांमुळे अनेक गावांतील समीकरणे बदलली असल्याने सत्तेचा तराजू दोलायमान झाला आहे.
तासगाव तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच गावांतील कारभार्यांनी मिशन ग्रामपंचायत सुरु केले असले तरी, मोठी लोकसंख्या असणाऱ्या गावांतच हाय होल्टेज ड्रामा रंगणार असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद गटांचा केंद्रबिंदू असणाऱ्या सावळज, विसापूर येळावी, मांजर्डे या गावांतील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. या गावांसह बोरगाव, पेड, कवठेएकंद, हातनूर ही गावे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसह लोकसभा आणि विधानसभेसाठी या गावांचे मतदान निर्णायक ठरणारे असल्याने, नेत्यांचेही या गावांतील घडामोडींवर लक्ष आहे. हाय होल्टेज ड्रामा असणार्या गावांमध्ये हातनोली, डोंगरसोनी, गव्हाण या गावांचाही समावेश आहे. तालुका आणि जिल्ह्यावर पद मिरविणार्या नेत्यांमुळे या गावांतील लढती लक्षवेधी ठरणार आहेत.
चौकट
आयाराम-गयारामांनी बदलली समीकरणे
पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सत्ता, खुर्चीच्या अट्टाहासातून पाच वर्षांत अनेक समीकरणे बदललेली आहेत. निवडून आलेल्या सरपंच, सदस्यांपासून पॅनेल प्रमुखांपर्यंत अनेकांनी या गटातून त्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे आयाराम-गयारामांच्या भूमिकेमुळे डोंगरसोनी, गव्हाण, गौरगाव, हातनोली, कौलगे, कवठेएकंद, सावळज, सिध्देवाडी, व्रजचौंडे, विसापूर या गावांतील समीकरणे बदलणार आहेत.
चौकट
कारभाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीत पदाधिकारी असणार्या कारभार्यांच्या गावात निवडणूक होणार असल्याने या गावांतील पदाधिकार्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. पेडमध्ये जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे, मांजर्डेत पंचायत समितीच्या सभापती कमलताई पाटील, विसापुरात जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, सावळजमध्ये जिल्हा परिषद सदस्य सागर पाटील, येळावीत पंचायत समिती सदस्य उमेश पाटील, काँग्रेसचे अमित पाटील, हातनोलीत बाजार समितीचे सभापती अजित जाधव, पंचायत समितीचे सदस्य सुनील जाधव, बोरगावमध्ये पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे