HSC 12th Result 2022: सांगली जिल्ह्यात मुलींचेच वर्चस्व, ९३.९१ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 04:53 PM2022-06-08T16:53:14+5:302022-06-08T16:54:04+5:30
सर्व शाखांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास मुलींचाच टक्का जास्त आहे.
सांगली : बारावी परीक्षेच्या निकालात जिल्ह्यात मुलींचाच वरचष्मा पाहायला मिळाला. जिल्ह्यातून विविध शाखांचे ३३ हजार २०१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ३१ हजार १८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी ९३.९१ आहे. यात उत्तीर्णमध्ये मुली ९६.५१ टक्के, तर मुले ९१.७४ टक्के आहेत. मुलींची आकडेवारी ४.७७ टक्क्यांनी अधिक आहे. आज, बुधवारी बोर्डाचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे.
सांगली जिल्ह्यातून विज्ञान शाखेच्या १६ हजार ६४० विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ४०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ही टक्केवारी ९८.५८ टक्के आहे. कला शाखेच्या नऊ हजार ५२६ विद्यार्थ्यांपैकी आठ हजार ३७८ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्यांची टक्केवारी ८७.९४ इतकी आहे. वाणिज्य शाखेच्या पाच हजार ४२१ विद्यार्थ्यांपैकी चार हजार ८९९ विद्यार्थी उत्तीर्ण असून, त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.३७ आहे. व्यावसायिक शाखेसाठी एक हजार ६०६ विद्यार्थी बसले होते, पैकी एक हजार ४९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्व शाखांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आकडेवारी पाहिल्यास मुलींचाच टक्का जास्त आहे. जिल्ह्यातील १८ हजार ९१ मुले परीक्षेस बसले होते. त्यापैकी १६ हजार ५९७ मुले उत्तीर्ण झाले असून, त्यांची टक्केवारी ९१.७४ आहे. १५ हजार ११० मुली परीक्षेस बसल्या होत्या. त्यापैकी १४ हजार ५८३ उत्तीर्ण झाल्या आहेत. यात ९६.५१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४.७७ टक्क्यांनी जास्त आहे.
शाखा निकालाची टक्केवारी
विज्ञान ९८.५८
कला ८७.९४
वाणिज्य ९०.३७
व्यावसायिक ९२.८३