उमदीमधील बेदाण्यास मिळाला उच्चांकी दर...
By admin | Published: July 20, 2014 11:30 PM2014-07-20T23:30:57+5:302014-07-20T23:44:39+5:30
प्रतिकूलतेवर मात : ३६१ रुपये किलो मिळाला दर
दरीबडची : प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड देत जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. तासगाव बाजार समितीमध्ये झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये उमदी (ता. जत) येथील शेतकऱ्यांच्या हिरव्या बेदाण्याला तब्बल ३६१ रुपये किलो इतका उच्चांकी दर मिळाला.
दुष्काळी परिस्थितीत गारपीट, अवकाळी पाऊस, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे तालुक्यातील बेदाणा उत्पादनात घट झाली असली, तरी बाजारात बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला आहे. निसर्गाने मारले, दराने तारले, अशी परिस्थिती द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांची झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बागायती पिके न घेता ठिबक सिंचनाचा वापर करीत द्राक्षे, डाळिंब अशा फळबागांकडे वळला आहे. पाणीटंचाई असूनही जत पूर्व भागातील उमदी, तिकोंडी, भिवर्गी, सिध्दनाथ, बिळूर, संख, डफळापूर, जालिहाळ खुर्द, मुचंडी, जालिहाळ बुदु्रक, कोंत्यावबोबलाद, दरीकोणूर या भागात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. तालुक्यात द्राक्षबागांचे क्षेत्र ४ हजार ६० हेक्टर इतके आहे.
गतवर्षी ११७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी कूपनलिका, विहिरीतील उपलब्ध पाणीसाठा तसेच टँकरद्वारे बागा जगविल्या होत्या. पाणी कमी असल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. काही बागांना घड विरळ सुटले होते; तर पाण्याअभावी ३० टक्के बागा वांझ झाल्या होत्या. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली होती. प्रतिकूल हवामानामुळे प्रारंभापासूनच दावण्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. औषधावर मोठा खर्च झाला होता. पाण्याच्या कमतरतेमुळे काड्या मध्यम प्रमाणात तयार झाल्या. खत कमी प्रमाणात वापरले. एमओपी, डीएपी ७:१०:५, करंजी पेंड सीपीपीएम यासारख्या खतांचा वापर करता आला नाही. पाण्याअभावी खताची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढविण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लागली नाही. त्यामुळे द्राक्षघड आणि मणी लहान तयार झाले.
पाण्याच्या व खताच्या योग्य मात्रेअभावी बेदाण्यास मोठ्या प्रमाणात फोलपटे तयार झाली होती. अवकाळी पावसामुळे, ढगाळ वातावरणामुळे बेदाणा काळा, डागी तयार झाला होता; मात्र यातून वाचलेल्या द्राक्षबागांच्या द्राक्षाचे उत्पादन चांगले झाले होते. (वार्ताहर)