मोरबगीच्या बेदाण्यास उच्चांकी ३२१ रुपये दर : जत तालुक्यातील उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:45 PM2018-05-19T23:45:18+5:302018-05-19T23:45:18+5:30

Highest rate of peacock shelf at Rs 321: Decrease in production of Jat taluka | मोरबगीच्या बेदाण्यास उच्चांकी ३२१ रुपये दर : जत तालुक्यातील उत्पादनात घट

मोरबगीच्या बेदाण्यास उच्चांकी ३२१ रुपये दर : जत तालुक्यातील उत्पादनात घट

googlenewsNext
ठळक मुद्देतीन वर्षात प्रथमच दराची गोडी; काळ्या मनुक्याला मागणी; शेतकरी समाधानी

संख : दुष्काळी परिस्थिती, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस यामुळे जत तालुक्यातील बेदाणा उत्पादनात घट झाली असली तरी, बेदाण्यास उच्चांकी दर मिळाला आहे. तीन वर्षात प्रथमच बेदाण्याला दराची गोडी लागली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बेदाणा सौद्यात हिरवा सुंटेखानी बेदाण्यास ३२१ रुपये असा उच्चांकी दर मिळाला आहे. यंदा पिवळ्या बेदाण्याबरोबरच काळ्या मनुक्यालाही आखाती देशात मागणी वाढल्याने विक्रमी निर्यात झाली आहे.

तालुक्यातील द्राक्षबागायतदार शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे बागायती पिके न घेता ठिबक सिंचनाचा वापर करीत द्राक्षे, डाळिंब फळबागांकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. उजाड, फोड्या रानात बागा फुलविल आहेत. पाणीटंचाई असूनसुद्धा ६ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. बिळूर, उमदी, तिकोंडी, भिवर्गी, डफळापूर, जालिहाळ खुर्द, सिद्धनाथ, करजगी, बेळोंडगी, जालिहाळ बुद्रुक, कोंत्यावबोबलाद या भागात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.

गेल्यावर्षी १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती होती. टॅँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. काही बागांना घड विरळ सुटले होते; तर पाण्याअभावी ४० टक्के बागा वांझ झाल्या आहेत. तसेच प्रतिकूल हवामानामुळे दावण्या रोगाचा प्रथमच मोठा प्रादुर्भाव झाला होता. बागांना दावण्याचा फटका बसला होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट झाली होती.

पाण्याअभावी एस. ओ. पी., डी. ए. पी. ७ : १० : ५, करंजी पेंड, सीपीपीएम यासारख्या खतांच्या प्रमाणात वापर करता आला नाही. खताची मात्रा कमी पडल्यामुळे फळ मोठे होण्यास, मण्याचा आकार वाढण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लागली नाही. त्यामुळे द्राक्षघड आणि मणी लहान तयार झाले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड देत तालुक्यातील शेतकºयांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. तासगाव बाजार समितीमध्ये झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये मोरबगी (ता. जत) येथील रविकुमार लक्ष्मण बगली या शेतकºयाच्या हिरवा सुंटेखानी बेदाण्यास ३२१ रुपये किलो इतका या वर्षातील उच्चांकी दराने मे. रोहिणी ट्रेडिंग कंपनीने खरेदी केला. सौद्यामध्ये सरासरी हिरव्या बेदाण्यास १३५ ते ३२१, पिवळा बेदाण्यास १५० ते १९० रुपये, काळा बेदाण्यास ७० ते ९५ रुपये असा दर मिळाला.गेल्या महिन्यातील बेदाणा सौद्यात उमदी (ता. जत) येथील लक्ष्मण पांडुरंग पवार यांच्या हिरवा बेदाण्यास ३०० रुपये दर मिळाला.

पिवळे, काळे बेदाणे : निर्यातीत वाढ
आखाती देशात इराणमधून येणाºया बेदाण्याची आवक कमालीची घटल्याने भारतातील बेदाण्यास याचा फायदा झाला आहे. बेदाण्याची निर्यात मोठी झाली आहे. हिरवा बेदाणा श्रीलंका, बांगला देशातही निर्यात झाला आहे.
निसर्गाने मारले; दराने तारले

दुष्काळ, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे बेदाणा उत्पादनात घट झाली असली तरी, बेदाण्याला उच्चांकी दर मिळाला आहे. ‘निसर्गाने मारले, दराने तारले’ अशी परिस्थिती शेतकºयांची झाली आहे. बेदाण्यातून तालुक्याला तीनशे कोटींच्या जवळपास उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे.

गेल्या पाच वर्षातील उच्चांकी दर
शेतकºयाचे नाव गाव वर्ष उच्चांकी दर
रमेश कराळे उमदी २०१४ ३६२ रुपये
प्रकाश माळी सिद्धनाथ २०१४ ३३५
लक्ष्मण पवार उमदी २०१८ ३००
रविकुमार बगली मोरबगी २०१८ ३२१

बेदाण्याची वैशिष्ट्ये - सुंटेखानी बेदाणा, २ सें. मी. पेक्षा जास्त लांबी व फुगीर टाईपचा बेदाणा, हिरव्या रंगाचा आकर्षक बेदाणा, साखरेचे प्रमाण अधिक, माणिक चमन वाणाची द्राक्षे, जिल्ह्यात साठवण क्षमता -१०० स्टोअरेज, माल साठवणुकीची क्षमता : १६००० गाडी.

Web Title: Highest rate of peacock shelf at Rs 321: Decrease in production of Jat taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.