सांगली जिल्ह्यात आढळली अतिविषारी घोणस अळी, अंबकच्या तरुणीस दंश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 12:21 PM2022-09-05T12:21:57+5:302022-09-05T12:22:25+5:30
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण
कडेगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेली अतिविषारी घाेणस अळी रविवारी सांगली जिल्ह्यातही आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अंबक (ता. कडेगाव) येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे (वय २०) या तरुणीस रविवारी दुपारी घाेणस अळीने दंश केला. यामुळे तीव्र वेदना हाेऊन तिचा पाय सुजला आहे. तिला उपचारासाठी चिंचणी (ता. कडेगाव) येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
लोकरी मावा, हुमणी आणि गोगलगाय अशा अळी व किडींच्या संकटाचा सामना करीत असताना शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अतिविषारी अळीच्या प्रादुर्भावामुळे नवे संकट उभे राहिले आहे. दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहेत. या वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर होत आहे. पिकांवर विविध प्रकारची कीड पडत आहे. काही दिवसांपूर्वी घोणस नावाच्या अळीचा प्रादुर्भाव समाेर आला हाेता. ही अळी गवतावर आणि ऊसावर पाहायला मिळते. तिचा परिणाम केवळ पिकांवर नाही तर माणसांवरदेखील होत आहे.
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याला घोणस अळीने दंश केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले हाेते. आणखी काही ठिकाणीही घाेणस अळीच्या दंशाच्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता हे संकट सांगली जिल्ह्यातही आल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.
अंबक येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे ही युवती रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. यावेळी गवतात असलेल्या घोणस अळीवर तिचा पाय पडला. अश्विनीच्या तळपायाला अळीने दंश केला. अळीच्या अंगावरील काटे अश्विनीच्या तळपायाला टोचले. यानंतर वेदना असह्य झाल्याने तिला चिंचणी येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.
यानंतर पुढील उपचारासाठी चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अश्विनीच्या आईने ही अळी प्लास्टिकच्या पिशवीतून डॉक्टरांना दाखवण्यासाठी रुग्णालयात आणली होती. यामुळे ती घोणस अळी असल्याचे स्पष्ट झाले. राज्यभरात चर्चेत असलेल्या या अळीची आजवर सांगली जिल्ह्यात नाेंद नव्हती. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.