जतमध्ये अतिक्रमण वाचविण्यासाठी महामार्गच अरुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:04+5:302021-06-05T04:20:04+5:30
फोटो ओळ : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गाची प्रस्तावित रुंदीही कमी झाली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क जत ...
फोटो ओळ : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गाची प्रस्तावित रुंदीही कमी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर असलेली शहरातील अतिक्रमणे वाचविण्यासाठी या महामार्गाची प्रस्तावित रुंदीही कमी करण्यात आली आहे. महामार्गाची २४ मीटर रूंदी असताना, रुंदी ही १८ ते २० मीटर इतकीच आहे.
रस्त्यावरील अतिक्रमणे वाचविली आहेत. त्यामुळे प्रस्तावित रस्त्याची रुंदी कमी झाली आहे.
या महामार्गाची जत शहरातून जाणाऱ्या रस्त्याची प्रस्तावित रुंदी ही २४ मीटर इतकी होती. परंतु प्रत्यक्षात जेव्हा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळी या २४ मीटर रूंदीच्या रस्त्यावर शहरातील अनेक राजकीय मंडळी व बडी धेंडे यांची अतिक्रमणे येत असल्याने त्यांनी आपली अतिक्रमणे वाचविण्यासाठी या महामार्गाची रुंदी ही १८ ते २० मीटर इतकी केली आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
राजकीय मंडळींनी राष्ट्रीय प्राधिकरणाचे चांगल्याप्रकारे सुरू असलेले काम बंद पाडून आपली अतिक्रमणे वाचविण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडील सिटी सर्व्हेच्या मापाप्रमाणे शहरातून जाणाऱ्या रस्त्याची मापे घेतली. यामुळे या मार्गाची जत शहरातील रस्त्याचे माप हे कमी-अधिक झाल्याचे दिसून येत आहे.
या रस्त्याचे काम प्रस्तावित मापाप्रमाणे झाले असते, तर भविष्यात या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व अपघात यावर नियंत्रण आले असते. परंतु राजकारणामुळे हा महामार्ग नेहमी चर्चेत राहिला आहे.
शहरातून जाणाऱ्या या मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजूला लोकांनी अतिक्रमण केल्याने तसेच शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनधारक आपली वाहने साईडपट्टयावर उभी करत असल्याने आधी अरुंद असलेला रस्ता अधिकच अरुंद होऊ लागला आहे.
यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जत शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरिकेट ऊभे करून रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाला आळा घालावा, अशी अपेक्षा जत नागरिकांकडून होत आहे.
कोट
रस्त्यामध्ये अर्धा मीटरचे रोड डिव्हायडरही बसविण्यात येणार आहेत. ते बसविण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नसून, नगरपरिषदेची आहे.
- अनिल पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी