हिंदकेसरी हरण्या-तांबडा हरण्याची बाजी; बेडग येथे जयंत केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार
By संतोष भिसे | Published: February 18, 2024 06:55 PM2024-02-18T18:55:12+5:302024-02-18T18:55:28+5:30
कोल्हापूरचा हिंदकेसरी हरण्या व तांबडा हरण्या या बैलजोडीने शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडत बाजी मारली.
बेडग: बेडग (ता.मिरज) येथील शिंदे साखर कारखान्याजवळील बेडग पट्टा येथे बैलगाडी शर्यतीचा थरार हजारो शौकिनांनी अनुभवला. कोल्हापूरचा हिंदकेसरी हरण्या व तांबडा हरण्या या बैलजोडीने शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडत बाजी मारली. मिरज दुय्यम बाजार समितीचे सभापती बापूसाहेब बुरसे युथ फाऊंडेशन व माजी समिती सभापती दिलीप बुरसे यांच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जयंत केसरी बैलगाडी शर्यत’ घेण्यात आली. चुरसीच्या बैलगाडी शर्यतीत कोल्हापूरचा हिंदकेसरी हरण्या व तांबडा हरण्या या बैलजोडीने १ लाख अकराशे अकरा रुपयाचे पहिले बक्षीस पटकावले. शर्यतीच्या निमित्ताने हजारो शौकिनांना बैलगाडी शर्यतीचा थरार पहायला मिळाला. प्रेमींनी हजेरी लावली होती.
स्पर्धेत जनरल गटात प्रथम क्रमांक संदिप पाटील, द्वितीय महेश बोंद्रे हरिपूर, तृतीय बबन नलावडे तासगाव यांनी क्रमांक मिळवला. ‘ब’ गटात प्रथम क्रमांक विजय नागरगोजे बेडग, द्वितीय शरद पाटील बेडग, तृतीय विष्णू पाटील बेडग यांनी क्रमांक मिळवला.
चौसा- दुस्सा मध्ये आण्णाप्पा अंकलखोपे, नारायण पाटील व प्रविण सानप यांच्या बैलगाड्यांनी शर्यत जिंकली. नवतर- आदतमध्ये संख्या वाढल्याने दोन वेळा शर्यत सोडण्यात आली. यामध्ये पहिल्या फेरीत अनिल पुणेकर, सचिन वाळेकर अन अमर ओमासे यांची बैलजोडी अनुक्रमे आली. दुसऱ्या फेरीमध्ये विनायक भंडारे, शरद पाटील आणि दस्तगिर शेख यांच्या बैलगाडीने अनुक्रमे क्रमांक मिळवला.
बैलगाडा शर्यत मैदानासाठी अविनाश पाटील, बाळासाहेब पाटील, सुजय शिंदे, बाबासाहेब मुळीक, दिनकर पाटील, मनोज शिंदे-म्हैसाळकर, बेडगचे सरपंच उमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील, बाळासाहेब नलवडे आदी उपस्थित होते. प्रारंभी आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस बापूसाहेब बुरसे व दिलीप बुरसे यांच्यावतीने कार्यक्रमाच्या ठिकाणी केक कापून साजरा केला. त्यांनतर बैलगाडा शर्यतीस सुरुवात करण्यात आली. शर्यतीनंतर सर्व विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली. यावेळी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.