Sangli: पेडमध्ये हिंदू-मुस्लिम समाजाच्या ऐक्याची निघाली पायी वारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 06:52 PM2024-07-13T18:52:48+5:302024-07-13T18:53:22+5:30
मांजर्डे : पेड (ता. तासगाव) येथे मोहरम आणि दिंडीच्या ऐक्याचा जागर पाहावयास मिळाला. यशवंत महाराजांच्या दिंडीचे पेड येथून पंढरपूरकडे ...
मांजर्डे : पेड (ता. तासगाव) येथे मोहरम आणि दिंडीच्या ऐक्याचा जागर पाहावयास मिळाला. यशवंत महाराजांच्या दिंडीचे पेड येथून पंढरपूरकडे पायी प्रस्थान झाले. यावेळी करबल मेलमधील मुस्लिम बांधव आणि वारकरी एकत्र आनंदाने नाचताना भक्तिमय वातावरण फुलून गेले होते. दिंडीमधील सहभागी सर्वधर्मीय आबालवृद्ध दिंडी आणि मोहरमच्या भक्ती सागरात बुडून गेले होते. यामुळे अनेक वर्षांची पेडच्या "हिंदू-मुस्लिम" ऐक्याची परंपरा कायम असल्याचा जणू संदेशच देत होता.
सांगली जिल्ह्यात पेडची विविध सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात एक वेगळी संस्कृती आहे. धार्मिक आणि सामाजिक सलोखा जपण्याचा वसा परंपरेने या गावात जपला जात आहे. सर्वधर्मीय एकमेकांच्या सुख-दुःखात न चुकता सामील होतात, ही येथील प्रत्येकाची संस्कृती आहे. विविध जाती-धर्मातील सण-उत्सवामध्ये ओसंडून वाहणारा आनंद देणारे गाव अशी पेडची ख्याती आहे. मोठ्याने लहानाला जपायचे असते अशी शिकवण पूर्वापार येथे पाळली जाते.
सालाबादप्रमाणे, पेडमधून पंढरपूरला पायी दिंडीचे प्रस्थान झाले. त्यावेळी, मोहरम आणि दिंडी एकत्र साजरी करताना सर्वधर्मीय आनंदाला उधाण आले होते. दिंडीला पंढरपूरकडे रवाना करताना बाहेरील वाड्यासमोरील मशिदीसमोर नजीर शिकलगार यांनी फराळाचे वाटप केले. मोहरम आणि दिंडी यांचा अनोखा सर्वधर्मीय उत्साह खऱ्या मानवतेचे दर्शन देणारा ठरल्याच्या भावना व्यक्त होत होत्या. मानवता जपणारे गाव म्हणून पेडची ओळख आहे. पेडमधील दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान झाले. मोहरम आणि दिंडी असा नयनरम्य सोहळा संपन्न झाला.