हिंगणगाव बुद्रुकची खाऊची पाने सातासमुद्रापार
By admin | Published: July 12, 2014 12:13 AM2014-07-12T00:13:50+5:302014-07-12T00:19:56+5:30
दिल्ली, युरोपमधून मागणी : क्षेत्र मात्र घटले; पुणे, मुंबई, चेन्नईतही पुरवठा
रजाअली पिरजादे - शाळगाव
कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव बुद्रुक येथील खाऊची पाने दिल्ली आणि युरोपला जाऊ लागली आहेत.
एकेकाळी हिंगणगाव येथील खाऊची पाने संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होती. त्यावेळी या परिसरात सुमारे ७५ ते १०० एकर पानमळ्याचे क्षेत्र होते. हिंगणगाव, चिखली, येडे, उपाळे या गावांतून पानमळे दिसत. सर्वाधिक पानमळे हिंगणगाव बुद्रुक येथे होते. मात्र १९७२ मध्ये दुष्काळ पडला आणि पानमळ्यांची संख्या हळूहळू कमी झाली. सध्या या भागात केवळ २० ते २५ एकर पानमळे असतील. अलीकडे पानमळे असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. कारण येथील खाऊची पाने आता दिल्ली आणि युरोपकडे रवाना होऊ लागली आहेत. दिल्ली-युरोपमध्ये ‘देशी पान’ म्हणून येथील पानाला लोकप्रियता प्राप्त झाली आहे. याशिवाय येथील पानांना पुणे, मुंबई, चेन्नई येथेही चांगली मागणी आहे.
हिंगणगाव तलावात आता टेंभूचे पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे पानमळ्यांना संजीवनी मिळाली असली तरी, अधिकतर शेतकरी ऊसपिकाकडे वळले आहेत. पानमळ्याला अधिक मेहनत घ्यावी लागते. मळ्यात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत. त्यामुळे पानमळ्यांची संख्या म्हणावी तशी वाढलेली दिसून येत नाही. एकदा पानमळा लावला, तर तो १५ ते २० वर्षे राहतो. बारमाही उत्पन्न मिळते. एकरी सुमारे तीन लाख रुपये खर्च येतो, तर दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
याबाबत पानमळ्याचे मालक संजय यादव म्हणाले की, १५ ते २० वर्षांपूर्वी गावात मोठ्या प्रमाणात पानमळे होते. जुन्या काळातील लोक हौसेने पान खात. प्रत्येकाकडे पानाची चंची दिसत असे. शरीरातील रक्ताला, पचनक्रियेला पानाचा फायदा होतो, असे बोलले जात असे. आता मावा, गुटख्याकडे कल दिसतो. आमचे पान देशी पान म्हणून प्रसिध्द आहे. पूर्वी मुस्लिम घराण्यांत पान खाण्याची परंपरा होती. बदलत्या काळानुसार पान खाणाऱ्यांची संख्या कमी झाली असली तरीही,अजून पानाला मोठी मागणी आहे.