त्याच्या स्वप्नांना गरिबीने छळले अन् कर्करोगाने ग्रासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:24 AM2021-01-21T04:24:50+5:302021-01-21T04:24:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गरिबीच्या अंधकारात चाचपडत असतानाच लहानपणीच त्याचे पितृछत्र हरपले. मोठ्या भावाला अपंगत्व आले आणि घरच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गरिबीच्या अंधकारात चाचपडत असतानाच लहानपणीच त्याचे पितृछत्र हरपले. मोठ्या भावाला अपंगत्व आले आणि घरच्या जबाबदारीचे मोठेशे गाठोडे डोईवर घेऊन एका तरुणाची धडपड सुरू होती. गरिबीने दिलेला त्रास कमी होता म्हणून की काय त्याचा कर्करोगाने पाठलाग सुरू केला. विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊनही शेवटच्या टप्प्यात येऊन हा तरुण आता एका शस्त्रक्रियेसाठी मदतीची याचना करीत आहे.
सांगलीच्या अहिल्यानगर येथे राहणाऱ्या अविनाश राजू हजारे या तरुणाची ही कहाणी अनेकांना वेदना देणारी आहे. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्याने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून तो व्यायाम शाळेत, क्रीडांगणावर कसरत करीत राहिला. पहिल्याच प्रयत्नात तो थोड्याच गुणाने पोलीस भरतीत अनुत्तीर्ण झाला. तरीही त्याचे कष्ट सुरू होते. मात्र, त्याला गरिबीपाठोपाठ कर्करोगाने ग्रासले.
हॉजकिन लिम्फोमा या विचित्र कर्करोगाने त्याला ग्रासले. निदान झाल्यानंतर त्याने लगेचच महात्मा फुले आरोग्य योजनेतून किमोथेरपीचे उपचार घेतले. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने हार्ड थेरपीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत घेतली. मात्र, ही मदत तुटपुंजी ठरली. त्यात त्याचे पूर्ण उपचार होऊ शकले नाहीत. त्याचा आजार सध्या ९० टक्क्यांवर बरा झाला असला तरी त्याला भविष्यात कधीही याचा सामना करावा लागू नये म्हणून डॉक्टरांनी त्यास बोनमेरो ट्रान्सप्लांटचा (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) सल्ला दिला आहे. त्यासाठी त्याला ६ लाख रुपयांचा खर्च सांगितला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेतल्यामुळे त्याला आता मदतीचे दरवाजे बंद झाले आहेत. शस्त्रक्रियेसाठी इतके पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न त्याला सतावत आहे. दुसरीकडे डॉक्टरांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत तातडीने ही शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे. अडथळ्यांची ही शर्यत संपण्याची त्याला प्रतीक्षा लागली आहे.
चौकट
आईला कष्ट करण्याची वेळ
गेल्या अडीच वर्षांपासून उपचारामुळे अविनाशने काम सोडले. त्याचा भाऊ हमाली करीत आहे, तर घराला हातभार व उपचारासाठी पैसे लागणार म्हणून आता अविनाशची आई एमआयडीसीमध्ये कामाला जात आहे.