इस्लामपुरातील 'त्या' विवाहितेचा खून, दोन मुलीच झाल्याच्या रागातून पतीने विहिरीत दिलं ढकलून
By श्रीनिवास नागे | Published: September 19, 2022 02:00 PM2022-09-19T14:00:12+5:302022-09-19T14:00:53+5:30
पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा करत पत्नी राजनंदिनी हिला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्यावरून घेऊन गेला. अन् विहिरीत ढकलून दिले.
सांगली : इस्लामपूर येथील कोळी मळा परिसरातील विवाहितेचा दोन मुलीच झाल्याच्या कारणातून पतीने विहिरीत ढकलून देत खून केल्याचे उघडकीस आले. ही घटना रविवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
राजनंदिनी कौस्तुभ सरनोबत (२९) असे खून करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचे नातेवाईक मिलिंद नानासाहेब सावंत (२६, रा. रमण मळा, कसबा बावडा, कोल्हापूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती कौस्तुभ कृष्णराव सरनोबत (३१, कोळी मळा, इस्लामपूर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
राजनंदिनीला पहिल्या दोन्ही मुली झाल्याचा राग कौस्तुभच्या मनात होता. त्यातून त्याने रविवारी पहाटे फिरायला जाण्याचा बहाणा करत पत्नी राजनंदिनी हिला आपल्या दुचाकीवरून कापूसखेड रस्त्यावरून घेऊन गेला. कापूसखेड गावच्या हद्दीत रस्त्यापासून ३०-४० फूट अंतरावर असलेल्या शेतात तिला सोबत घेऊन गेला. तेथे त्याने पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत राजनंदिनीला ढकलून दिले. तिला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. उत्तरीय तपासणी केल्यावर तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.