मिरजेतील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीत, रुग्णसेवेबाबत देशभरात मिळविला होता लौकिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 02:02 PM2022-01-06T14:02:18+5:302022-01-06T14:05:30+5:30
सुमारे १२५ वर्षांपूर्वी अमेरिकन मिशनरी डाॅ. विल्यम वाॅन्लेस यांनी मिरजेत स्थापन केलेल्या मिशन रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने लाैकिक मिळविला.
मिरज : मिरजेतील ऐतिहासिक वाॅन्लेस रुग्णालय आर्थिक अडचणीत आल्याने रुग्णालयातील सुमारे सहाशे कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले सहा महिने वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. या परिस्थितीत ‘वाॅन्लेस’च्या संचालकपदाची सूत्रे डाॅ. प्रभा कुरेशी यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
सुमारे १२५ वर्षांपूर्वी अमेरिकन मिशनरी डाॅ. विल्यम वाॅन्लेस यांनी मिरजेत स्थापन केलेल्या मिशन रुग्णालयामुळे देशभरात रुग्णसेवेबाबत मिरजेने लाैकिक मिळविला. दिल्लीस्थित चर्च ऑफ नाॅर्थ इंडियातर्फे संचलन करण्यात येणारे वाॅन्लेस रुग्णालय गैरव्यवस्थापनामुळे गेल्या दहा वर्षांत आर्थिक अडचणीत आले आहे. सद्य:स्थितीत रुग्णालयावर सुमारे ४० कोटी रुपये कर्ज असून, त्यापैकी कामगारांची देणी २० कोटींवर आहेत.
रुग्णालयातील डाॅक्टरांना वर्षभर, परिचारिका व तंत्रज्ञ, कर्मचाऱ्यांना गेले सहा महिने वेतन मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर गेले नऊ वर्षे संचालक असलेले डाॅ. नथानिएल ससे यांनी राजीनामा दिल्याने डाॅ. प्रभा कुरेशी यांच्याकडे संचालकपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. रुग्णालयास आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी वाॅन्लेस व्यवस्थापनाने ऑफ नाॅर्थ इंडियाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. मात्र, सीएनआयने हात आखडते घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वॉन्लेसच्या कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी सीएनआय व व्यवस्थापनाविरुद्ध गेल्या आठवड्यापासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
वॉन्लेसच्या नवीन संचालक प्रभा कुरेशी यांनी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, वेतन मिळेपर्यंत आंदोलनाचा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. राजीनामा देणारे संचालक डाॅ. ससे यांना रुग्णालय आवारात प्रवेशबंदीचे फलकही आंदोलकांनी लावले आहेत. आंदोलकांची चर्चा फिस्कटल्याने रुग्णालय व्यवस्थापन यातून कसा मार्ग काढणार याकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
लवकरच अडचणी दूर हाेतील : कुरेशी
रुग्णालयास आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सीएनआयकडे मदतीची मागणी केली आहे. ही मदत मिळताच रुग्णालयासमोरील सर्व अडचणी दूर होतील, असा विश्वास नूतन संचालक डाॅ. प्रभा कुरेशी यांनी व्यक्त केला.