आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:17 AM2021-07-09T04:17:31+5:302021-07-09T04:17:31+5:30

फोटो ०८ संतोेष ०४ : आतील बाजूस असलेला देवनागरी लिपीतील शिलालेख लोकमत न्यूज नेटवर्क पलूस : आंधळी परिसरातील बारवमध्ये ...

The historical barracks at Andhali are still in good condition after 216 years | आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीत

आंधळी येथील ऐतिहासिक बारव २१६ वर्षांनंतरही सुस्थितीत

googlenewsNext

फोटो ०८ संतोेष ०४ : आतील बाजूस असलेला देवनागरी लिपीतील शिलालेख

लोकमत न्यूज नेटवर्क

पलूस : आंधळी परिसरातील बारवमध्ये शके १७२७मधील शिलालेख आढळला आहे. महाराष्ट्र बारव (विहीर) मोहिमेतर्फे राज्यभरातील इतिहासकालीन विहिरी, बारव, कुंड, पुष्करणी यांचा धांडोळा घेतला जात आहे. या मोहिमेदरम्यान आंधळी येथील बारवेतील शिलालेखाचा पत्ता लागला.

या शिलालेखावरील मजकुराचे विश्लेषण करुन इतिहास समाजासमोर आणण्याचे काम करणार असल्याचे मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या मोहिमेंतर्गत मंगळवारी (दि. ६) आंधळी परिसरातील सिकंदर शिकलगार यांच्या शेतात ऐतिहासिक बारव असल्याची माहिती मिळाली होती. या मोहिमेतील कार्यकर्त्यांनी पाहणी केली असता, दगडाचे अत्यंत देखणे बांधकाम केलेली बारव समोर आली. हा ऐतिहासिक ठेवा आजपर्यंत समाजासमोर आला नाही, याचेही आश्चर्य वाटले. गावापासून दूर व दुर्लक्षित ठिकाणी बारव आहे. बांधकामाची भव्यता पाहताक्षणी जाणवते. इतिहासाची साक्ष देणारी अंतर्गत रचना अजूनही मजबूत आहे. मोठी दगडी कमान, आत उतरण्यासाठी असणाऱ्या दणकट पायऱ्या यामुळे ताकद स्पष्ट होते. आतील भिंतीवर शिलालेख आहे. त्यावर देवनागरी लिपीत मजकूर लिहिला असून, पटवर्धन संस्थानिकांचा उल्लेख आहे. असाच शिलालेख कर्नाळ येथील बारवमध्येदेखील असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

दोहोंवरील मजकूर एकसारखा असून, फक्त गावांच्या नावाचा फरक आहे. त्यामुळे हे दोन्ही शिलालेख आणि दोन्ही बारव एकाचवेळी बांधल्याचे दिसते. बारवमध्ये अजूनही थंडगार पाणी भरलेले असते.

शिलालेखाची माहिती कार्यकर्त्यांनी पुण्यातील शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांना पाठवली आहे. त्यांच्याकडून लवकरच तपशीलवार माहिती उपलब्ध होईल, असे बारव मोहिमेचे सदस्य महेश मदने यांनी सांगितले. या शोध मोहिमेत सिकंदर शिकलगार, दगडू जाधव, मारुती शिरतोडे यांनी भाग घेतला.

कोट

जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक वास्तू, बारव आणि इमारती अत्यंत सुस्थितीत आहेत. दोन-तीनशे वर्षांनंतरही त्या इतिहासाची साक्ष देत अखंडित स्वरुपात उभ्या आहेत. शासनाने त्यांची निगा राखण्याची गरज आहे, तरच पुढील पिढीला हा ठेवा उपलब्ध होईल.

- महेश मदने, महाराष्ट्र बारव मोहीम, सांगली.

Web Title: The historical barracks at Andhali are still in good condition after 216 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.