तासगावचा आज ऐतिहासिक रथोत्सव
By admin | Published: September 6, 2016 12:44 AM2016-09-06T00:44:27+5:302016-09-06T01:16:35+5:30
मंदिराला रोषणाईचा साज : गणपती पंचायतन, प्रशासन, पोलिसांची जय्यत तयारी
तासगाव : तासगावचा २३७ वा पारंपरिक ऐतिहासिक रथोत्सव मंगळवार, दि. ६ रोजी होत आहे. दुपारी १ वाजता रथोत्सव सोहळ्यास सुरुवात होत आहे. रथोत्सवासाठी गणेशनगरी तासगाव सज्ज झाली आहे. श्री गणपती पंचायतनच्यावतीने जोरदार तयारी केली आहे. गणेशभक्तांची उसळणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस, नगरपालिकेसह प्रशासन सज्ज झाले आहे.
तासगावच्या गणपती पंचायतनच्यावतीने रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने या रथोत्सवास सुरुवात होणार आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवात गणरायाचे सोमवारी शहरात सर्वत्र घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी मोठ्या उत्साहात आगमन झाले. रथोत्सवाच्या स्वागतासाठी तासगाव शहरात उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा गजबजलेल्या दिसून येत आहेत.
तासगावच्या संस्थानच्या गणपतीची दीड दिवसाची ऐतिहासिक परंपरा आहे. गणपतीच्या स्थापनेनंतर दुसऱ्याचदिवशी विसर्जन करण्यात येते. या दिवशीचा रथोत्सवही ऐतिहासिक असतो. महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही हजारो भाविक तासगावचा हा रथोत्सव पाहण्यास येतात. (प्रतिनिधी)
तासगावात वाहतूक व्यवस्थेत बदल
राज्यभरातून येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी तासगाव पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. सांगली, मिरज, कवठेमहांकाळ येथून येणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था नवीन तहसील कार्यालयासमोरील पटांगणात करण्यात आली आहे. आटपाडी, विटा, सावळज येथून येणाऱ्या वाहनांची चिंचणी रोड येथे, तर ५ वा मैल, भिलवडी, पलूस, तुरची येथून येणाऱ्या वाहनांसाठी भिलवडी नाका, दर्यावर्दी मंडळ, विद्यानिकेतन क्रीडांगण व जोतिबा मंदिर पाठीमागे व्यवस्था करण्यात आली आहे. बसेससह, सर्व वाहने विटा नाका, बसस्थानक, सिद्धेश्वर चौक, भिलवडी नाका, बायपास ते वसंतदादा कॉलेज सांगलीकडे त्याच उलट बाजूने बायपासने वळविण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंंगळे आणि तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली.
शहरात सर्वत्र मोठा पोलिस
बंदोबस्त तैनात
तासगावचा रथोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक यांच्यासह ५ पोलिस निरीक्षक, २२ पोलिस उपनिरीक्षक, राज्य राखीव दलाची एक तुकडी, सशस्त्र दलाच्या दोन तुकड्या, होमगार्ड, २४१ पोलिस कर्मचारी, ५० महिला पोलिस, तसेच गर्दीवर नजर ठेवण्यासाठी ६ छायाचित्रकार तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मिलिंंद पाटील यांनी दिली.