इतिहासाचा मागोवा समाजासाठी महत्त्वाचा : भालचंद्र वग्याणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 12:46 AM2018-04-04T00:46:52+5:302018-04-04T00:46:52+5:30
सांगली : पुस्तकांमधून विविध गोष्टींचे ज्ञान मिळविताना इतिहासाचाही मागोवा घेण्याची गरज आहे. त्यातील घटना, व्यक्ती, त्यांचे कार्य समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी
सांगली : पुस्तकांमधून विविध गोष्टींचे ज्ञान मिळविताना इतिहासाचाही मागोवा घेण्याची गरज आहे. त्यातील घटना, व्यक्ती, त्यांचे कार्य समजून घेऊन वाटचाल केली पाहिजे, असे मत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भालचंद्र वग्याणी यांनी सांगलीतील कार्यक्रमात व्यक्त केले.
दक्षिण भारत जैन सभा व जैन महिला परिषद या पहिल्या शाखेच्या ११९ व्या वर्धापन दिनाचा सोहळा येथील शेठ रा. ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये मंगळवारी सायंकाळी पार पडला. यावेळी व्यासपीठावर हस्तिनापूर येथील प. पू. पीठाधीश रवींद्रकीर्ती महास्वामीजी, रावसाहेब आ. पाटील, प्रा. डी. ए. पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, रावसाहेब जि. पाटील आदी उपस्थित होते.
वग्याणी म्हणाले की, सांगलीतील दक्षिण भारत जैन सभेने येथील ग्रंथालयाला ज्ञानमती माताजींचे नाव देऊन ज्ञानाचा प्रवास दर्शविला आहे. ज्यांच्याकडे माता असते, त्यांच्याकडे मतीही असते आणि मती असणारे ज्ञान प्राप्त करू शकतात. त्यामुळे या नावाला महत्त्व आहे. बऱ्याच लोकांना आपल्या पूर्वजांबद्दलही माहिती नसते. जिथे कुटुंबातील मागील पिढ्यांमधील लोकांची माहिती घेण्याबद्दल आपण उदासीन असतो, तेव्हा स्वातंत्र्यलढ्यात किंवा त्यापूर्वी योगदान दिलेल्या लोकांप्रती माहिती घेण्यापासून आपण कोसो दूर असतो. त्यामुळे प्रत्येकाने इतिहासाचा मागोवा घ्यावा.
स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाचा विचार केला, तर प्रत्येकजण १९४७ आणि १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यासाठीच्या उठावापर्यंतच पोहोचतो. प्रत्यक्षात स्वातंत्र्यलढ्याची इतिहासातील पहिली नोंद ही भगवान बाहुबली यांच्या माध्यमातून हजार वर्षांपूर्वी नोंदली गेली आहे. त्यामुळे संपूर्ण जगालाच त्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आहे. प्रसुतीच्या वेदनेप्रमाणे लेखक झाल्याशिवाय लेखनासाठी आलेल्या वेदनासुद्धा कोणाला कळत नाहीत. त्यामुळे समाजाला दिशा देणाºया अशा लेखकांप्रती आपण आदरभाव व्यक्त केला पाहिजे.
आशीर्वचन देताना पीठाधीश रवींद्रकीर्ती महास्वामीजी म्हणाले की, कोणताही समाज महिलांशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे महिलांविषयी आदरभाव ठेवलाच पाहिजे. ज्ञानमती माताजींनी शिक्षण कमी होऊनही ग्रंथांची अफाट निर्मिती केली आहे. ते कार्य खूपच अलौकिक असे आहे. येथील वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळ यांचे शिस्तबद्ध कार्य वाखाणण्याजोगे आहे. कोणत्याही महोत्सवातील नियोजनात हे दोन्ही दल आमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. मांगी-तुंगी येथे येथील संघटनेने गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन करावे.स्वागत प्रा. राहुल चौगुले यांनी, प्रास्ताविक दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सागर चौगुले, सचिव मीना घोदे यांनी केले. प्रशांत पाटील-मजलेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. जयपाल चौगुले, सौ. अनिता पाटील यांनी केले.
पुस्तकाचे प्रकाशन थाटात
लेखक प्रा. डी. ए. पाटील यांच्या ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील जैन स्वातंत्र्यसेनानींचे योगदान’ या पुस्तकाचे तसेच प्रथमाचार्य शांतिसागरजी महाराज संक्षिप्त हिंदी परिचय पुस्तिका ‘गुरुगरिमा’ या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडले. या पुस्तकनिर्मितीची कथा लेखक पाटील यांनी यावेळी मांडली.
आरोग्याविषयी जागृती महत्त्वाची : मगदूम
मुंबईचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल मगदूम यावेळी म्हणाले की, समाजातील लोकांनी शिक्षण आणि आरोग्याविषयी जागरुक राहिले पाहिजे. कर्करोगाचे प्रमाण वाढत असताना त्याचे प्रमाण कमी व्हावे, याविषयी जागृती वाढावी म्हणून आम्ही शिबिरे घेत आहोत. यास प्रतिसादही चांगला मिळत आहे. भविष्यात सुदृढ समाजव्यवस्था निर्माण होण्यासाठी या चळवळीची मदत होईल.