Maharashtra Election 2019 : निवडणुकीसाठी हायटेक प्रचारसाधने बाजारपेठेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:06 PM2019-10-14T18:06:19+5:302019-10-14T18:07:48+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, उमेदवार व समर्थकांसाठी पाठीवर लावता येणारे एलईडी डिस्प्ले अशी हायटेक प्रचार साधने उपलब्ध झाली आहेत. जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्याची दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सदानंद औंधे
मिरज : विधानसभा निवडणुकीसाठी बिल्ले, झेंडे, टोप्या, उमेदवार व समर्थकांसाठी पाठीवर लावता येणारे एलईडी डिस्प्ले अशी हायटेक प्रचार साधने उपलब्ध झाली आहेत. जीएसटी व प्लास्टिक बंदीमुळे प्रचार साहित्याची दरवाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
निवडणुकीसाठी उमेदवारांसाठी प्रचारपत्रके, छत्री, झेंडे, टोप्या, मफलर, बिल्ले, बिल्ल्यांचा हार, पिशवी, रॅलीसाठी कट्आऊट, आकाश दिवा या प्रचार साहित्यासोबत डमी मतदान यंत्र, स्टेज व्हॅन, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅन, एलईडी सायकल डेमो, उमेदवाराचा माहितीपट, सोशल मीडियावर प्रचाराची व्हिडीओ क्लीप, एसएमएसव्दारे व्हॉईस कॉल, कलाकारांच्या आवाजात उमेदवाराच्या प्रचाराची ध्वनिफित, पथनाट्य पॅकेज उपलब्ध आहे.
अॅपव्दारे मतदारांना मोबाईल मेसेजव्दारे बुथनुसार मतदान स्लिप पाठविण्याची सोय आहे. मतदारांची नावे, महिला, पुरुष, जात, वय, पत्ता अशा वर्गीकरणाची सोय असलेले मोबाईल अॅप उपलब्ध आहेत. विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सर्व विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय मतदार यादी असलेल्या मोबाईल अॅपची लाखात किंमत आहे. मात्र अशिक्षित व स्मार्ट फोन नसलेल्या मतदारांसाठी प्रचार पत्रके व मतदान स्लिपांचा वापर करावा लागणार आहे.
सभा व कोपरा सभेसाठी खुर्च्या व ध्वनिक्षेपकाची सोय असलेल्या स्टेज व्हॅनचे प्रतिदिवस १० हजार रुपये, हायड्रोलिक एलईडी डिस्प्ले व्हॅनचे प्रतिदिवस १० हजार रुपये भाडे आहे. उमेदवाराच्या एलईडी दिव्यांची सोय असलेल्या डेमो सायकलची सुमारे १० हजार रुपये किंमत आहे. उमेदवाराचे चिन्ह व ध्वज असलेल्या पाठीवर बांधता येणाऱ्या एलईडी डिस्प्लेची ३ हजारापर्यंत किंमत आहे.
ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून उमेदवाराच्या प्रचाराचा ३० मिनिटाचा माहितीपट तयार करण्यासाठी १ लाख रुपये खर्च आहे. कोणालाही परिधान करता येईल, असा उमेदवाराच्या चिन्हाचा फुग्याचा वेश उपलब्ध आहे. ८ रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत झेंडे, बिल्लयाचा हार २० रुपये, डमी मतदान यंत्र १५० रुपये, मफलर ५ ते १० रुपये, छत्री २५० रुपये आकाश दिवा २५ रुपये अशा प्रचार साहित्याच्या किमती आहेत.