आतापर्यंत खाणाऱ्यांमुळे सरकार पडले, आता पिकवणाऱ्यांमुळेही सरकार पडेल; बच्चू कडू यांची टीका
By शरद जाधव | Published: August 24, 2023 04:27 PM2023-08-24T16:27:59+5:302023-08-24T16:29:29+5:30
...त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले.
सांगली : ऐंशीच्या दशकात कांद्याचे दर वाढल्याने सरकार पडले, वाजपेयी सरकारही याचमुळे पडले. आतापर्यंत खाणाऱ्या वर्गाच्या असंतोषाचा परिणामातून सरकार पडले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, अडचणीवर बोलायला सरकार अजिबातच तयार नाही. त्यामुळे आतापर्यंत खाणाऱ्यांच्यामुळे सरकार पडल्याचा अनुभव आहे आता पिकवणाऱ्यांच्यामुळेही सरकार पडू शकते. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सांगलीत केले.
‘दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी’ अभियानासाठी सांगलीत आलेल्या आ. कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधतान सरकारच्या भूमिकेवर सडकून टिका केली. आ. कडू म्हणाले की, कांदा आणि टोमॅटोच्या दरवाढीवरून सरकारमध्ये निर्णय घेतले जात आहेत. यात डिसेंबरचा विचार करून कांद्यावर लावण्यात आलेला ४० टक्के अतिरिक्त शुल्काची काहीच गरज नव्हती. तरीही शासनाने हा निर्णय घेतलाच असेलतर आता यातून मिळणारे शुल्क कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाच द्यावे.
सरकारकडून नेहमीच खाणाऱ्याचाच विचार केला जातो. ७५ वर्षांपासून आपण हीच व्यवस्था पाहत आलो आहे. आजवर कधीही पिकवणाऱ्याचा विचार केला जात नाही. त्यामुळेच आतापर्यंतची सरकारे ही खाणाऱ्या वर्गामुळे पडल्याचा अनुभव आपल्याला आहे. अगदी तसेच आता पिकवणाऱ्यांमुळेही पडू शकते. यासाठी शेतकऱ्यांमध्ये मात्र, जागृती होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांची एकजूट राहावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
मुळात कांदा खाल्लाच पाहिजे असे काहीच नाही. कांदा न खाल्ल्याने कोणी मरतही नाही. कांद्याऐवजी लसूण खावा अथवा मुळा खावावा. शासनाकडूनच आता प्रत्येक घटकाला खऱ्या न्यायाची प्रतिक्षा असल्याचेही ते म्हणाले.
दरवाढीसाठीही हस्तक्षेप करा
आ. बच्चू कडू म्हणाले की, जेव्हाही केव्हा शेतमालाचे दर वाढतात. तेव्हा लगेच शासन त्यामध्ये हस्तक्षेप करते. मात्र, ज्यावेळी त्याच शेतमालाचे दर कमी झाले तर ते वाढवावेत आणि शेतकऱ्यांनाही काहीतरी पदरात पडावे यासाठी शासन काही करताना दिसत नाही.