हिवरे तिहेरी खून प्रकरणी दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:26 PM2020-02-04T14:26:39+5:302020-02-04T14:54:38+5:30
खानापूर तालुक्यातील हिवरे येथील तिहेरी खून प्रकरणी सुधीर सदाशिव घोरपडे (वय २४) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय २३) या दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनाविण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी खटला चालविला.
सांगली : खानापूर तालुक्यातील हिवरे येथील तिहेरी खून प्रकरणी सुधीर सदाशिव घोरपडे (वय २४) आणि रवींद्र रामचंद्र कदम (वय २३) या दोघांना मरेपर्यंत कारावासाची शिक्षा मंगळवारी सुनाविण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी खटला चालविला.
खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी, मतकुणकी येथील सुधीर घोरपडे याची बहीण विद्याराणी हिचा हिवरे येथील शिंदे कुटुंबात विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसानंतर विद्याराणी हिने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून तिचा सासरच्या लोकांकडून घातपात झाल्याची फिर्याद विटा पोलिसात देण्यात आली होती. या खटल्यातून शिंदे कुटुंबीय निर्दोष सुटले होते. तेव्हापासून सुधीर घोरपडे शिंदे कुटुंबीयावर चिडून होता.
२१ जून २०१५ रोजी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम हे दोघे शिंदे वस्तीवर आले. त्यावेळी घरातील पुरुष कोणीही नव्हते. घरात तीन महिला अंगणात बसल्या होत्या. सुधीर घोरपडे याने पाणी मागण्याचा बहाणा करून प्रभावती शिंदे यांना घरात पाठविले त्यावेळी या दोघांनी घरासमोर बसलेल्या निशिगंधा शिंदे व सुनीता पाटील यांच्यावर चाकूने हल्ला केला.
या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या दोघींच्या ओरडण्याच्या आवाजाने प्रभावती शिंदे बाहेर आल्या तेव्हा त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यांचाही त्यात मृत्यू झाला. त्यांचा आरडाओरडा ऐकून वस्तीवरील लोक घटनास्थळाकडे धावले तोपर्यंत दोघेजण पळून गेले होते.
त्यानंतर विटा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोमवारी युक्तीवाद झाल्यानंतर आज निकाल देण्यात आला. त्यानुसार दोघांनाही मरेपर्यंत कारावासाची शिक्षा शिवाय दिड लाखांचा दंडही ठोठाविण्यात आला आहे. एकाचवेळी तीन महिलांच्या खूनाची घटना घडल्याने निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहीले होते.