हॉकी स्पर्धेत देवगिरी, इस्लामपूरची विजयी सलामी-अकरा संघ सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 09:53 PM2019-01-12T21:53:41+5:302019-01-12T21:54:02+5:30
सांगली : सांगलीत राष्ट्रीय क्रीडापटू मारूती हरी पाटील निमंत्रितांच्या खुल्या हॉकी स्पर्धांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला. विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या ...
सांगली : सांगलीत राष्ट्रीय क्रीडापटू मारूती हरी पाटील निमंत्रितांच्या खुल्या हॉकी स्पर्धांना शुक्रवारपासून प्रारंभ झाला. विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या स्पर्धा सुरू आहेत.
पहिला सामना देवगिरी फायटर्स (कोल्हापूर) विरूध्द जयहिंद मंडळ (सांगली) यांच्यात झाला. अनुभवी देवगिरी संघाने ९-१ अशा मोठ्या फरकाने जयहिंद संघाचा पराभव केला. सामनावीर किताब ‘जयहिंद’च्या ओंकार बाबर याला प्रदान करण्यात आला.
दुसरा सामना निशिकांत पाटील स्पोर्टस् क्लब (इस्लामपूर) विरूध्द पोलीस बॉईज (कोल्हापूर) यांच्यात झाला. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकरवर हा सामना झाला. या लढतीत चपळ खेळाडूंचा भरणा असलेल्या निशिकांत पाटील स्पोर्टस् क्लबने ४-२ अशा फरकाने बाजी मारली. स्पर्धेचे उद्घाटन अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश सावर्डेकर यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे होते. सावर्डेकर यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. जयहिंद मंडळाचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी स्वागत केले. संजय देव यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पाटील यांनी आभार मानले. पंच म्हणून कपिल मोरे व दत्ता पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी राजू चौगुले, मधुकर पाटील, सिकंदर अमिन, सुभाष कागवडेकर, सत्यप्पा कांबळे, अशोक नरदेकर, अशोक लोंढे आदी उपस्थित होते. अंतिम सामना १३ जानेवारी रोजी सायंकाळी होणार असून, त्याचवेळी पारितोषिक वितरण होणार आहे. जयहिंद व्यायाम मंडळाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सांगलीत सुरु असलेल्या हॉकी स्पर्धेत शनिवारी देवगिरी स्पोर्टस क्लब (कोल्हापूर) विरुध्द जयहिंद मंडळ (सांगली) यांच्यातील चुरशीचा क्षण.