हमालांचे शासनाविरोधात धरणे
By admin | Published: September 20, 2016 10:55 PM2016-09-20T22:55:25+5:302016-09-20T23:08:13+5:30
कष्टकऱ्यांविरोधातील आदेश रद्दची मागणी : दिवाळीत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा
सांगली : शासनाने दि. ६ सप्टेंबररोजी आदेश काढून माथाडी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करून त्यातील तरतुदींचा दुरुपयोग रोखण्यासाठी एकतर्फी कृती आराखडा तयार केला आहे. हमाल व मापाडी कामगार संघटनेशी चर्चा न करताच हा निर्णय घेतला आहे. तो रद्द करावा, यासह अन्य मागण्यांसाठी हमाल पंचायतीच्या नेतृत्वाखाली हमालांनी मंगळवारी बाजार समिती येथे धरणे आंदोलन केले. आदेश रद्द न केल्यास दिवाळीत बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
शासनाच्या बेजबाबदार धोरणाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मागण्या अशा : कामगार खात्यात पुरेसे अधिकारी व कर्मचारी नसल्याने माथाडी मंडळाकडे दुर्लक्ष होत आहे. सर्वच ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त व सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे कामगार विभागाचे काम पाहत अन्य मंडळांचे अध्यक्ष व सचिव पदाचे काम करावे लागत आहे. यामुळे हमालांचे प्रश्न सोडविले जात नसल्यामुळे गैरसोय होत आहे. माथाडी मंडळाकडे व त्यांच्या अधिकाऱ्यांकडे इतर मंडळांचा कार्यभार देऊ नयेत. माथाडी मंडळाचे शासकीय लेखापरीक्षण करावे. माथाडी मंडळाचा लेव्हीचा दर ४० टक्के करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात संघटनेचे सरचिटणीस बापूसाहेब मगदूम, विकास मगदूम, उपाध्यक्ष गोविंद सावंत, बाजार समितीचे प्रतिनिधी बाळासाहेब बंडगर, राजाराम बंडगर, प्रल्हाद व्हनमाने, बजरंग खुटाळे, श्रीमंत बंडगर, शालन सलगर, बिरू बंडगर, मंगल शिवशरण आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)
सांगलीत कोट्यवधीची उलाढाल ठप्प
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विष्णुअण्णा फळ मार्केट येथे शंभर टक्के हमालांनी मंगळवारी आंदोलन केले. तसेच दिवसभर कामाला सुटी दिल्यामुळे बाजार समितीमधील हळद, गूळ आदी खरेदी व्यवहाराची कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे.