दिल्लीतील आंदोलनाला पाठिंब्यासाठी सांगलीत धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:39+5:302020-12-15T04:42:39+5:30
१४सांगली सीटी : केंद्र सरकारच्या निषेधार्थ किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे सांगलीत जिओ कार्डची होळी करण्यात आली. - सांगली : ...
१४सांगली सीटी : केंद्र सरकारच्या निषेधार्थ किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे सांगलीत जिओ कार्डची होळी करण्यात आली.
-
सांगली : दिल्ली येथे गेल्या सोळा दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे सांगलीत स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या निषेधाच्या आंदोलकांनी जोरदार घोषणा दिल्या.
किसान संघर्ष समितीतर्फे गेल्या दहा दिवसांपासून दिल्ली आंदोलनाला पाठिंबा म्हणून किसान बाग आंदोलन सुरू आहे. दररोज रात्री सात ते नऊ या वेळेत स्टेशन चौकात हे आंदोलन सुरू आहे. देशभर आंदोलक रस्त्यावर उतरले असूनही केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही. त्यामुळेच आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यासाठी विविध संघटना पुन्हा रस्त्यावर उतरल्या आहेत. सोमवारी स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक सामाजिक संघटना, शेतकरी, विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, हमाल मापाडीचे विकास मगदूम, शंकर पुजारी, रमेश सहस्रबु्ध्दे, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, ॲड्. सुधीर गावडे, ॲड्. राहुल जाधव, डॉ. रवींद्र व्होरा, ज्योती अदाटे, सदाशिव मगदूम, वि. द. बर्वे, मुनीर मुल्ला, राहुल पाटील, तोहिद शेख, संदीप कांबळे, ओम भोसले, राजू कांबळे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
चौकट
जिओ कार्डची होळी
केंद्र सरकार शेतकऱ्यांऐवजी रिलायन्स जिओसह अन्य भांडवलदारांचे हित पाहत आहे. या घटनेच्या निषेधार्थ सांगलीतील आंदोलकांनी रिलायन्सच्या जिओ कार्डची होळी करून निषेध केला.