विरोधकांकडून होळी; काँग्रेसचे प्रत्युत्तर
By admin | Published: July 22, 2014 12:36 AM2014-07-22T00:36:27+5:302014-07-22T00:39:38+5:30
मनपा अंदाजपत्रकीय सभा : सभागृहाबाहेर भिडले
सांगली : महापालिकेच्या अंदाजपत्रकावर आज, सोमवारी सभेपेक्षा सभागृहाबाहेरच सत्ताधारी व विरोधकांत रणकंदन माजले. सभा संपल्यानंतर राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी पालिका मुख्यालयासमोर अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची होळी केली, तर याच्या निषेधार्थ महापौर कांचन कांबळे, गटनेते किशोर जामदार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या सर्व सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करीत, विरोधकांना सद्सद्विवेकबुद्धी द्यावी, असे साकडे घातले. दोन्ही बाजूच्या घोषणांनी मुख्यालय दणाणून गेले.
महापालिकेच्या अंदाजपत्रकावरील चर्चेवेळी सभागृहात सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या गोंधळातच महापौर कांबळे यांनी अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. सभा संपल्याचे जाहीर करताच विरोधक आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हा गोंधळ पंधरा ते वीस मिनिटे सुरू होता. सभागृहात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपया’ असे फलक आणले होते. सभा संपल्यानंतर हे फलक सभागृहात फडकविले. त्यानंतर राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीचे नगरसेवक एकत्र येत त्यांनी अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची होळी केली. यावेळी विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, भाजपचे गौतम पवार, गटनेते शिवराज बोळाज, माजी महापौर मैनुद्दीन बागवान उपस्थित होते. / पान २ वर
अंदाजपत्रकावर सूचना मांडण्यापेक्षा विरोधकांनी वैयक्तिक टीका सुरू केली. त्यांना दोनदा विनंती करूनही राजकीय चर्चा सुरूच ठेवली होती. लोकसभेला काय झाले, विधानसभेला काय होणार, ही चर्चा करण्यासाठी सभा नव्हती. यापुढे विरोधकांना जशास तसे उत्तर देऊ. सभागृह कसे चालवायचे, हे आम्हाला चांगलेच कळते.
- किशोर जामदार, गटनेते, काँग्रेस
महापालिकेच्या अंदाजपत्रकात रस्ते, खड्डे, नागरी प्रश्नांसाठी तरतूद नाही. उत्पन्नाचे मार्ग वाढविण्याचाही विचार केलेला नाही. सत्ताधाऱ्यांनीच राजकीय घोषणाबाजी करीत सभेतून पळ काढला. त्यांचा निषेध म्हणून अंदाजपत्रकाची होळी केली.
- गौतम पवार,
नगरसेवक, स्वाभिमानी आघाडी.