Sangli: वास्तुशांती, सत्यनारायण, ना कोणतेही कर्मकांड; आसद येथे शाहू, फुले, आंबेडकर अन् शिवरायांच्या साक्षीने गृहप्रवेश
By संतोष भिसे | Published: April 2, 2024 03:46 PM2024-04-02T15:46:58+5:302024-04-02T15:47:48+5:30
अतुल जाधव देवराष्ट्रे : मी नास्तिक नाही, पण देवाच्या नावाखाली चालणारा बाजार मला मान्य नाही. ज्यांनी समाजाला ज्ञानाचा प्रकाश ...
अतुल जाधव
देवराष्ट्रे : मी नास्तिक नाही, पण देवाच्या नावाखाली चालणारा बाजार मला मान्य नाही. ज्यांनी समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला, त्या शाहू, फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच आमचे दैवत असे सांगत आसद (ता. कडेगाव) येथील पंढरीनाथ जाधव यांनी नव्या घरात गृहप्रवेश केला. धार्मिक कर्मकाडांचे अवडंबर माजविणाऱ्यांपुढे वेगळा आदर्श निर्माण केला.
जाधव यांनी १५०० चौरस फुट जागेवार ३० लाख रुपये खर्चून टुमदार बंगला उभा केला आहे. बंगल्याचे काम पूर्ण होताच पै-पाहुण्यांना गृहप्रवेशाची निमंत्रणे गेली. प्रत्यक्ष सोहळ्यावेळी मात्र पाहुण्यांना वेगळाच अनुभव आला. होम, हवन, गृहदेवतेची पूजा, भटजी, सत्यनारायण, पंचामृताचा प्रसाद या कशाकशाचा पत्ता नव्हता. एका खोलीत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा मांडल्या होत्या. त्यांचीच पूजा केली होती आणि आरतीदेखील याच महापुरुषांची गायली होती.
वास्तुशांतीचा हजारो रुपयांचा खर्च, भटजीची दक्षिणा हा सारा पैसा अनाथ मुलांसाठी देणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. समाजात दररोज सोबत असणाऱ्या नातलग, मित्रमंडळींना टॉवेल व टोपी देऊन सत्कार करण्यात आला.