महिला सरपंच ठरल्या फक्त ‘होम मिनिस्टर’!
By admin | Published: April 28, 2017 11:55 PM2017-04-28T23:55:03+5:302017-04-28T23:55:03+5:30
महिला सरपंच ठरल्याफक्त ‘होम मिनिस्टर’!
सातारा/कऱ्हाड : आरक्षणामुळे जिल्ह्यातील अनेक गावांत सरपंचपदाची माळ महिलांच्या गळ्यात पडते; पण या पदावर महिला नामधारीच असल्याची परिस्थिती काही गावांमध्ये आहे. पत्नी सरपंच असेल तर तिचा पती या पदाचा रूबाब झाडताना दिसतो. तसेच सही सोडून सरपंचपदाचे बाकी सर्व अधिकारही हेच महाशय गाजवतात.
ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली की पॅनेल प्रमुखांकडून उमेदवारांची शोधाशोध केली जाते. सरपंच पदासाठीचा उमेदवार निवडताना नेते मंडळी अनेकवेळा चाचपणी करतात. त्यातच सरपंच पदासाठी महिला आरक्षण पडले तर जवळच्या कार्यकर्त्याच्या पत्नीला किंवा आईला निवडणूक लढविण्याची गळ घातली जाते. त्यासाठी संबंधित कार्यकर्ताही संधीचे सोने करण्यासाठी धडपडतो. मात्र, निवडणूक होऊन सरपंचपदी निवड झाल्यानंतर संबंधित महिलेला सहीशिवाय दुसरा कोणताच अधिकार गाजवता येत नसल्याची परिस्थिती आहे.
अनेक गावांत महिला सरपंच फक्त ‘होम मिनिस्टर’ आहेत. पतीने सांगितल्याशिवाय त्या ग्रामपंचायत कार्यालयातही जात नाहीत. कधी गेल्याच तर फक्त खुर्चीवर बसण्याचे काम त्यांना करावे लागते. ग्रामपंचायतीचे बहुतांश निर्णय सरपंचांच्या परस्पर त्यांच्या पतीला विचारूनच घेतले जातात.
सरपंचांचे पतीही पत्नीच्या परस्पर या सर्व उचापती करीत असतात. ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थही महिला सरपंचांच्या पतीलाच ‘सरपंच’ म्हणून ओळखतात.
तसा रूबाबच पतीकडून झाडला जातो. त्यामुळे पत्नीची सरपंच पदाची ओळख फक्त ग्रामपंचायत कार्यालयापुरती राहते. तसेच सार्वजनिक कार्यक्रम व इतर खासगी कार्यक्रमांनाही सरपंचपदाचे निमंत्रण म्हणून पतीलाच बोलवणे केले जाते.
पंचायत समिती तसेच इतर शासकीय कार्यालयात ग्रामपंचायत स्तरावरील कामासाठी महिला सरपंचांनाच जावे लागते. मात्र, त्याठिकाणी नेमकं करायचं काय, हेच सरपंचांना माहिती नसते. अधिकाऱ्यांनी विचारलेली माहितीही त्यांना देता येत नाही. अखेर महिला सरपंचांना काहीच माहिती नसल्याने ग्रामसेवकच अधिकाऱ्यांना आवश्यक ती माहिती देऊन वेळ मारून नेतात.
अन् सरपंच असल्याचंच विसरल्या!
कऱ्हाडनजीकच्या एका गावात २६ जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी महिला सरपंच उपस्थित होत्या. ध्वजारोहण झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सुरू झाला. त्यावेळी सरपंचांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार, असे निवेदकाने पुकारले. मात्र, सरपंच जागच्या हलल्या नाहीत. त्या काहीकाळ पतीकडेच पाहत बसलेल्या. अखेर ग्रामसेवकांनी त्यांना ‘मॅडम तुम्हीच पुढे व्हा,’ असे सांगितले. त्यावेळी त्या महिला सरपंच सत्कारासाठी पुढे गेल्या. हा किस्सा कित्येक दिवस गावात चर्चिला जात होता.
निवडणूक गावपातळीवरील असली तरी राजकारणात येण्यासाठी, निवडणूक लढविण्यासाठी ‘गॉड फादर’ हा लागतोच लागतो. सरपंचांचा मुलगा, नातू, पुतण्या किंवा सून पुन्हा निवडणूक लढवतात अन् विजयी होतात. घरातच सत्ताकेंद्र असल्याने अनेकदा विकासकामाकडे दुर्लक्ष होते. पण आता थेट जनतेतून सरपंच ठरणार असल्याने यापुढे कोणत्याही ‘गॉड फादर’ची गरज भासणार नाही. एखादा तरुण राजकारणात येऊ इच्छित असल्यास तो सरपंच पदासाठी थेट उभा राहू शकतो अन् मतदारांचा विश्वास असल्यास तो विजयीही होऊ शकतो. त्यामुळे यापुढे एकप्रकारे ‘गॉड फादर’ला सुटीच मिळणार आहे.