टाॅप शंभरकडे १३ कोटींची घरपट्टी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:14+5:302021-02-27T04:35:14+5:30
सांगली : महापालिकेने थकीत घरपट्टीवसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १०० मालमत्ताधारकांची यादी तयार ...
सांगली : महापालिकेने थकीत घरपट्टीवसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १०० मालमत्ताधारकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याकडे १२ कोटी ८० लाख रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी मालमत्ताधारकांच्या दारापर्यंत जात आहेत. या थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेऊन कर न भरल्यास जप्तीची कारवाई केली जाईल, असे करनिर्धारक व संकलक नितीन शिंदे यांनी सांगितले.
महापालिकेने घरपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी दंड व शास्तीमध्ये १०० टक्के माफी दिली आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत आहे. घरपट्टी वसुलीसाठी महापालिकेची यंत्रणा सरसावली आहे. सध्या घरपट्टीची थकबाकी जवळपास ९० कोटी ८८ लाख रुपयांची वसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यापैकी आतापर्यंत २६ कोटी ८४ लाख रुपये वसूल करण्यात आले आहे.
घरपट्टी विभागाने एक लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या १०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली आहे. या मालमत्ताधारकांकडे १२ कोटी ८० लाख रुपयांची थकबाकी आहे. यात शहरातील शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालये, उद्योजक, व्यापाऱ्यासह बड्या लोकांचा समावेश आहे. घरपट्टी विभागाकडील अधिकारी व कर्मचारी या थकबाकीदारांच्या दारापर्यंत जात आहे. त्यांना अभय योजनेची माहिती देऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करीत आहेत. घरपट्टीसोबतच पाणीपट्टीच्या थकबाकीची वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. ३१ मार्चनंतर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जाणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
चौकट
सहायक आयुक्तांवर जबाबदारी
महापालिकेकडील सहा सहायक आयुक्तांवरही आयुक्त नितीन कापडणीस यांनी करवसुलीची जबाबदारी सोपविली आहे. घरपट्टीसाठी चार प्रभाग समितीनिहाय सहायक आयुक्तांची नियुक्ती केली आहे. तर, पाणीपुरवठ्यासाठी दोन सहायक आयुक्तांवर जबाबदारी सोपविली आहे. प्रत्येक प्रभाग समितीतून दररोज नऊ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्टही देण्यात आले आहे.